जय भारत ठेकेदार कंपनीचा दावा; पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा
| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील जुन्या कशेडी घाटातील 2005 पासून खचणाऱ्या 105 मीटरच्या डेंजर झोन रस्त्यावर 15 मेपर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित असताना अमेरिका-इराण युद्धामुळे कशेडी घाटातील डेंजर झोनचे काम रखडले असल्याचा दावा जय भारत ठेकेदार कंपनीचे अमित चंदनानी यांनी केला आहे.
आगामी पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास स्थानिकांकडून उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे अध्यक्ष शैलेश पालकर यांनीदेखील कोकणातील पत्रकारांनी चौपदरीकरणाच्या आंदोलनाचा एल्गार पुकारलेल्या कशेडी घाटाच्या रस्त्यासाठी पुन्हा एकवटण्याचे आवाहन कोकणातील पत्रकारांना केले आहे. दरम्यान, मागील वेळी प्रमाणे खचणारा डेंजर झोनचा भराव करण्यासाठी दोनशे मीटर अंतरावर दगडखाणीत स्फोटकांचा वापर झाल्याने अतिवृष्टी काळात जुन्या कशेडी घाटातील रस्त्यावर डोंगरातून भुस्खलन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यासंदर्भात जय भारत ठेकेदार कंपनीतर्फे अमित चंदनानी यांनी अमेरिका आणि इराण दरम्यानच्या युध्दपरिस्थितीमुळे आवश्यक इंधन डिझेल व जिओसिन्थेटीक कच्च्या मालाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला नाही. महामार्ग बांधकाम विभागाच्या निर्देशानुसार सर्व बांधकाम सामुग्री खचणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी आणण्यासाठी अतिशय कष्ट व विलंब झाला. जिथपर्यंत कातळ आहे तिथपर्यंत दरवर्षी आणणारा डेंजर झोनचा 105 मीटरचा कशेडी घाटातील रस्ता खोदून काढला. यावेळी दरवेळी केलेल्या डांबरीकरणाचे सुमारे 12 ते 15 बीटूमीन रस्त्याचे थर दिसून आले. आयआयटी मुंबईच्या मार्गदर्शनाखाली तसेच तंत्रज्ञांनी दिलेल्या निर्देशानुसार झिंक व अल्युमिनियम कोटेड जाळ्यांचे नेटवर्क तयार करून त्यामध्ये हार्ड रॉक्सचे गॅबियन स्ट्रक्चर करून त्याला डोंगरातील कातळात 15 ते 20 ड्रील करून त्यामध्ये 30 मीमी स्टील बार फिट करण्यात आले असल्याने 45 अंशात्मक कातळातून हे गॅबियन स्ट्रक्चर सुमारे 10 ते 15 वर्षे निसटणार नाही. परिणामी, यावर्षीचे डेंजर झोनचे काम कायमस्वरूपी टिकाऊ असेल, अशी माहिती दिली. याठिकाणी नैसर्गिक भूजलस्त्रोत असून यातील पाणी अतिक्षारयुक्त असल्याने स्टील गंजून नष्ट होत असे. मात्र झिंक व अल्युमिनियम कोटेड जाळ्या या क्षारयुक्त भुजलामुळे गजणार नसल्याचे जय भारत ठेकेदार कंपनीचे अमित चंदनानी यांनी सांगितले.
यावेळी कोंढवीचे सुहास मोरे यांनी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, महाविद्यालय, बाजारहाट यासाठी 12 गावांसह 28 वाड्यावस्त्यांचे जनजीवन या डेंजर झोनचे काम रखडल्याने रस्ता संपर्क तुटून बाधित होणार आहे. जय भारत ठेकेदार कंपनीतर्फे या जनतेसाठी खासगी प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी स्थानिकांच्या वतीने करून पावसाळ्यात रस्ता बंद ठेवण्याची वेळ ओढवली तर उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिला. याप्रसंगी पळचिलचे उमेश मोरै व सनी जाधव आदींनी उपस्थित राहून जय भारत ठेकेदार कंपनीतर्फे अमित चंदनानी यांना स्थानिकांच्या गैरसोयीबद्दल कडक शब्दात सुनावले. दरम्यान, डेंजर झोनपासून दोनशे मीटर अंतरावर दगडखाणीत स्फोटकांचा वापर करून गॅबियन स्ट्रक्चर मध्ये दगडांचा भराव केला जात आहे. या स्फोटकांच्या स्फोटामुळे माती आणि कातळातील एकजिनसीपणा नष्ट होऊन अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी भूस्खलनाचा धोका निर्माण झाला असून नजीकच्या काळात अशा प्रकारच्या आपत्तीला जय भारत ठेकेदार कंपनी जबाबदार राहील, असा इशारा स्थानिकांनी दिला.
या डेंजर झोनची पाहणी छगन भुजबळ यांनी पहिल्यांदा तर त्यानंतर खा. सुनील तटकरे, खासदार डॉ. निलेश राणे, बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, शिवेंद्रसिंहराजे भोसले आदींनी केल्याची जाणीव जय भारत ठेकेदार कंपनीच्या अमित चंदनानी यांना देण्यात आली.






