प्रदूषित पाण्याचा संशय; नमुने तपासणीसाठी पाठवले
। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील घोट गावात शुक्रवारी (दि.5) घडलेल्या घटनेत विषबाधेमुळे सात गाई दगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील बी. एम. पाटील यांच्या गोशाळेतील 40 गुरांपैकी 19 जनावरांना विषबाधेची लक्षणे दिसून आली होती. यापैकी 11 जनावरांवर पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत उपचार करण्यात आले, तर सात गाईंचा मृत्यू झाला.
विषबाधा झालेल्या जनावरांमध्ये 7 ते 8 महिन्यांच्या गर्भार असलेल्या 3 गाईंचा समावेश होता. उपचारानंतर त्यांची अकाली प्रसूती झाली असून वासर दगावल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पनवेल पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बाधित जनावरांवर उपचार केले. दरम्यान, मृत गाईंचे शवविच्छेदन करण्यात आले नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. जनावरांच्या मालकाकडून अधिकृत तक्रार प्राप्त झाली नसल्याने शवविच्छेदनाची प्रक्रिया करण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेनंतर परिसरातील सिडकोच्या डम्पिंग ग्राउंडकडे संशयाची सुई वळली आहे. डम्पिंग ग्राउंडची सुरक्षा भिंत काही ठिकाणी पडल्यामुळे कचरा शेजारील पाणवठ्यात जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे पाणी प्रदूषित होऊन ते पाणी पिल्याने जनावरांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
मात्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांनी या शक्यतेला नकार दिला आहे. घटनेची दखल घेत परिसरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
परिसरातील प्रदूषणामुळे वारंवार जनावरे दगावत आहेत, मात्र प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
प्रतिक्रिया देण्यास प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांचा नकार
घडलेल्या प्रकारावर प्रतिक्रिया देण्यासाठी प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी प्रशांत भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शवत वरिष्ठांकडे बोट दाखवले.
तळोजा परिसरात गुर दगावण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने स्थानिक शेतकरी देशोधडीला लागला आहे. माझ्या 40 गुरांपैकी 19 जनावरांना बाधा झाली होती. उपचारांमुळे काही जनावरे वाचली, मात्र सात गाई दगावल्या.
– बी. एम. पाटील, गोशाळा मालक
विषबाधेमुळे जनावरे दगावल्याचा प्राथमिक अंदाज असून, मालकाने तक्रार न केल्याने पशु वैद्यकीय विभागाकडून पुढील कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
– सचिन देशपांडे, उपायुक्त, रायगड जिल्हा पशु संवर्धन विभाग.
मी स्वतः घटनास्थळी उपचारासाठी उपस्थित होतो. गुराच्या मालकाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार गुरांना अन्नात ज्वारीची फुटव देण्यात आली होती. ही फुटव खाल्याने गुरांना अन्नातून विषबाधा झाली असण्याचा प्राथमिक अंदाज आहे.
– डॉ. सुभाष जाधव, सहायक पशु वैद्यकीय अधिकारी, पनवेल






