। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड अलिबाग मतदार संघातील जनता ही सुज्ञ असून विधानसभेचे नेतृत्व करणारे आमदार यांनी मागील पाच वर्षात अधिवेशनात एक सुद्धा प्रश्न न विचारून लोकांच्या प्रतिनिधित्वाचे अवमूल्यन केले आहे. मतदार संघातील विकास खोळंबला असून मतदार संघातील कार्यभार गतिमान करण्यासाठी मला एक संधी द्या. तसेच, या मतदार संघातील हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी लोकांनी बहुमताने मला निवडून द्या, असे आवाहन अलिबाग-मुरुड आणि रोहा विधानसभा मतदार संघातील मविआ पुरस्कृत शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी केले आहे.
महाविकास आघाडीतर्फे मुरुड शहरात शुक्रवारी (दि.15) सकाळी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मुरुड शहराची ग्राम देवता कोटेश्वरी मातेचे दर्शन घेऊन असंख्य बाईक रॅली व वाहनांचा ताफा संपूर्ण शहरात फिरवण्यात आला. बाजारपेठ येथील पक्ष कार्यालयात रॅलीची सांगता करताना जनतेशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
यावेळी चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी सांगितले की, व्यापारी वर्गाला माझ्याकडून कोणताही त्रास दिला जाणार नाही. व्यापारी लोकांना जो विकास आवश्यक आहे, त्यावर त्यांच्याशी चर्चा करून त्यावर निर्णय घेऊन सर्वसमावेशक निर्णय घेतले जातील. अलिबाग-मुरुड आणि रोहा विधानसभा क्षेत्रातील मुस्लिम समाजास मानाचे स्थान देणार असून समान न्याय तत्वार कार्यभार चालवणार आहे. महिलांची सुरक्षितता व रोजगार देण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. तसेच, हुकूमशाही व गद्दार सरकारला घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले. या रॅलीत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे मुरुड शहर अध्यक्ष आदेश दांडेकर, प्रमोद भायदे, माजी नगरसेविका मुग्धा जोशी, विश्वास चव्हाण, कुणाल सतविडकर, विजय वाणी, मनोहर बैले, मनोहर मकु, तुकाराम पाटील, विजय गिदी, माजी सभापती चंद्रकांत कमाने, राहील कडू, श्रीकांत वारगे, इस्माईल शेख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.