। सुकेळी । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका सुरू असतानाच शनिवारी (दि.16) सकाळी 11.10 वाजण्याच्या सुमारास सुकेळी गावाच्या हद्दीमध्ये कार व टँकर या दोन वाहनांमध्ये अपघात झाला. सुदैवाने अपघातात कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक अब्दुल जब्बार फाकी (43) हे आपल्या ताब्यातील कारने कोलाड बाजूकडून मुंबईकडे जात होते. दरम्यान, सुकेळी हद्दीमध्ये आले असता टँकरचालक शिवकुमार (27) यांनी चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करताना टँकर व कार या दोन वाहनांमध्ये धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र वाकण टॅब येथील कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर त्यांनी रस्त्यावरील दोन्ही वाहने बाजूला करून अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली.