। उरण । प्रतिनिधी ।
उरण विधानसभा मतदारसंघातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी चढाओढ सुरू आहे. शेकापचे तरुण उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना मतदारांचा वाढता पाठींबा मिळत असल्याने करंजा गावातील सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी जाहीर पाठींबा देऊन त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सचिन डाऊर प्रीतम म्हात्रे यांना पाठींबा देत म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत उरण मतदारसंघातील गावागावातील मूलभूत समस्या, रस्ते, पाणीटंचाई, स्वच्छता, आरोग्य, बेरोजगारी, सुसज्ज रुग्णालय या समस्या भेडसावत असून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची व्यवस्था उरणमध्ये नसल्यामुळे नवी मुंबई किंवा मुंबईमध्ये जावे लागत आहे. आगामी काळात उभारण्यात येत असलेल्या लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर असणार्या नोकरीत स्थानिक प्रकल्पग्रस्त तरुणांना समाविष्ट करण्याचा विषय, तसेच करंजा-रेवस सागरीसेतूमध्ये नोकरी आणि व्यावसायिक संधी या सर्व गोष्टींचा विचार करीता प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे हे सक्षम आहेत. तसेच, त्यांना मतदारसंघात दिवसेंदिवस वाढता पाठींबा मिळताना दिसत आहे. त्यामुळे प्रीतम म्हात्रे यांना माझ्यासह सहकार्यांच्या साथीने जाहीर पाठींबा देत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.