। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग शहरातील रस्ते, पाणी, गटार आदी सुविधांसाठी दोनशे कोटी रुपये आणले असल्याचा दावा आमदार दळवी यांनी एका प्रचार सभेमध्ये केला. परंतु, विकासासाठी आणलेला निधी गेला कुठे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अलिबाग शहरातील गटारासह रस्ते व पाण्याचा प्रश्न सोडविण्यास आमदार उदासीन ठरल्याचे चित्र समोर आहे. आमदारांनी पाच वर्षांत शहराचा काय विकास केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेकापच्या माध्यमातून आणि माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कल्पकतेतून शहराचा विकास झाल्याचे शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
अलिबाग शहर पर्यटनाबरोबरच ऐतिहासिक ठिकाण म्हणून ओळखले जाते. शहरातील रस्ते, पाणी तसेच समुद्रकिनारी सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून झाल्या आहेत. शेकापचे नेते जयंत पाटील, दिवंगत माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. पंडित पाटील, दिवंगत ना.का. भगत, दिवंगत माजी आ. मधुकर ठाकूर, अॅड. खानविलकर यांंचे शहरातील विकासासाठी योगदान राहिले आहे. अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कल्पकेतून शहराचा कायापालट झाला आहे.
पाच वर्षांत शहरातील विकासासाठी दोनशे कोटी रुपये आणल्याचा दावा आमदार दळवी यांनी केला. प्रत्यक्षात मात्र दळवी यांनी शहरातील कुठला विकास केला, नाविन्यपूर्ण कोणती कामे आणली? पाट्या लावणे, नारळ फोडून उद्घाटन करणे आणि आकडे सांगणे सोपे झाले आहे. प्रत्यक्षात मात्र शहरातील विकास पाच वर्षांत झालाच नसल्याचे अॅड. मानसी म्हात्रे यांनी आमदारांचा दावा खोडून काढत स्पष्ट केले आहे.
मागील पाच वर्षांत शहरातील नाविन्यपूर्ण कामे आणली का, शहरातील पाण्याचा प्रश्न सोडविला का, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
दळवींनी आणलेले दोनशे कोटी रुपये कुठे वापरले? पाच वर्षांमध्ये महिला भवन, शैक्षणिक संकुल उभे राहिले का, असा सवाल उपस्थित करीत मानसी म्हात्रे म्हणाल्या, आकडे सांगणे, पाट्या लावणे व उद्घाटन करून नारळ फोडणे सोपे काम झाले आहे. जिथे पाटी लावली, त्या ठिकाणी काय काम झाले आहे? आंग्रे समाधीजवळील काम अजूनही प्रलंबित आहे. त्यांच्याच माणसांना टक्केवारी देण्यासाठी कामे आणले. निष्ठांवत मंडळींना कामे देतो असे सांगून गाजर दाखवण्याचे काम आमदार दळवी यांनी केल्याचा आरोप अॅड. मानसी म्हात्रे यांनी केला. या शहराचा विकास माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कल्पकतेतून झाला असून, त्यांच्याशिवाय शहराचा कोणीही विकास करू शकत नाही, असे मानसी म्हात्रे म्हणाल्या.