ग्रामीण मतदारांचा कौल कुणाला?
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
विधानसभा क्षेत्रात ग्रामीण भागापेक्षा शहरी मतदारांची संख्या जास्त असल्याने पनवेल विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढणारे सर्वच पक्षाचे उमेदवार शहरी भागातून सर्वात जास्त मतदान आपल्यालाच होणार, असा दावा करत आहेत. मात्र वाढीव मालमत्ता कर, अपुर्या सोयी-सुविधा आणि नैना प्रकल्प यामुळे नाराज असलेल्या स्थानिक मतदारांनी आपली मते एकाच उमेदवाराच्या पारड्यात टाकण्याचा विचार केल्यास शहरी मतांच्या भरवशावर विजयाचे गणित मांडून बसलेल्या उमेदवारांची गणित बिघडण्याची शक्यता आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघ शहरी मतदारांची संख्या जास्त आहे. जवळपास पाच लाखांच्या आसपास हा आकडा असून, येथील मतदार कोणाला कौल देतील, यावर निकाल अवलंबून असल्याचे गृहीत धरून सर्वच पक्षातील उमेदवार शहरी भागात प्रचारावर भर देत आहेत. विधानसभा क्षेत्रात भाजप, शेतकरी कामगार पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात प्रामुख्याने लढाई आहे. राष्ट्रीय पक्ष आणि भाजपाचे वातावरण असल्याने कमळाला मागील दोन निवडणुकीमध्ये शहरी मतदारांनी पसंती दिली. परंतु, यावेळी शिट्टी आणि मशालीच्यासुद्धा अशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यांनीसुद्धा इथे आपल्याला मतदान होईल, असा प्रकारचा दावा केला आहे. शिट्टी आणि माशालीकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार शहरी भागातून सर्वच उमेदवारांना मतदान झाल्यास शहरी भागातील मतांमध्ये विभाजन होऊन ग्रामीण भागातून जास्त मतदाधिक्य घेणार्या उमेदवाराचा फायदा होण्याची शक्यता आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदार संख्या ही साडेसहा लाखांवर पोहोचली आहे. त्यापैकी दीड लाख मतदार हे ग्रामीण भागात आहे. उरलेले पाच लाख मतदार हे सिडको वसाहती आणि पनवेल शहरात आहेत. शहरी मतदारांची सर्वाधिक संख्या या ठिकाणी आहे. त्यामध्ये घाटमाथ्यावरील अनेक लोक येथे राहतात. तसेच परराज्यातील नागरिकांची संख्यासुद्धा बर्यापैकी या ठिकाणी आहे. ग्रामीण भागाचा विचार करत असताना येथे शेकापचा पारंपरिक मतदार आहेत. त्यामुळे येथून आपल्याला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल, असा विश्वास या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांनी शहरी भागात लक्ष देण्यास अधिक सुरुवात केली आहे.
नवीन पनवेल कामोठे आणि कळंबोली या वसाहतीत जास्तीत जास्त मतदान आपल्याकडे वळावे याकरितासुद्धा महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जात आहेत. मागील तीन निवडणुकीचा विचार करता एकदा काँग्रेस आणि दोनदा भाजपाच्या बाजूने कौल शहरी मतदारांनी दिला आहे. या ठिकाणी गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील लोक वास्तव्यास आहेत. त्यांचे मतदार याद्यांमध्ये नाव असून, त्यांनी प्रामुख्याने राष्ट्रीय पक्षाला प्राधान्य दिले आहे. गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय आणि दक्षिणात्य मतदार स्थानिक पक्षांना पसंती देतील, अशी शक्यता वाटत नसल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. या सर्व गोष्टींचा उलगडा येणार्या 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
शहरी भागातून आपल्यालाच मताधिक्य मिळेल असे गणित लावून उमेदवार बसले आहेत. मात्र, यापूर्वी झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून नेहमीच कमी मतदान होत असते. त्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदानाची टक्केवारी जास्त असते. असे झाल्यास शहरी भागातील मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. तर ग्रामीण भागात होणारी मतांची टक्केवारी एकाच उमेदवाराच्या पारड्यात पडल्यास ग्रामीण भागातून लीड घेणारा उमेदवार विजयी होण्याची शक्यता जास्त आहे.
ग्रामीण भागात नैना तसेच मलमत्ता कर आणि असुविधा मुद्दा!
पनवेल ग्रामीणमध्ये नैनाला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला आहे. यामुळे काही प्रमाणात शेतकर्यांमध्ये नाराजी आहे. मालमत्ता कराबाबतही विरोधक आक्रमक झाले आहेत. हा मुद्दा पुढे करण्यात आला आहे. त्यामुळे हे दोन मुद्दे किती प्रभावी ठरतात, त्याचा मतदानावर किती परिणाम होतो, हे पाहणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे ठरेल.