दोन वर्षांत 42 वीटभट्ट्या बंद
| श्रीवर्धन | वार्ताहर |
सतत बदलणार्या वातावरणामुळे तालुक्यातील वीटभट्टी व्यवसाय संकटात आला आहे. तालुक्यात दोन वर्षांत 60 वीटभट्ट्यांपैकी 42 वीटभट्ट्या बंद झाल्या आहेत, तर उर्वरित 18 वीटभट्ट्या भुसा, लाकडांचा तुटवडा व मजुरांची कमतरता आदी कारणास्तव बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
डोंगरावरील लाल माती किंवा शेतजमिनीमधील काळ्या मातीचा वापर वीट बनवण्याकरिता करण्यात येतो. भट्टीच्या फडात (मोकळ्या जागेवर) मातीचा ढिगारा करून मजुरांकडून पायाने मळण्यात येते. एकजीव झालेली ओली माती सुकू लागल्यावर मजूर हाताने आयताकार लाकडी साच्यात टाकून विटेचा आकार देतात. ओली वीट साच्यातून काढीत पाच ते सहा दिवस नैसर्गिकरित्या सुकवली जाते. त्यानंतर काही प्रमाणात सुकलेल्या विटांचा भट्टीत थर रचून पोकळीत लाकूड आणि भुशाच्या (कोंडा) सहाय्याने भट्टी पेटवण्यात येते. पक्की वीट तयार होण्यास 15 दिवसांचा कालावधी लागतो.
बांधकाम व्यावसायिकांच्या मागणीनुसार, वेगवेगळी लांबी, रुंदी, उंचीप्रमाणे व्यावसायिक विटा तयार करतात. साधारण नोव्हेंबर किंवा डिसेंबरपासून व्यावसायिक वीटभट्ट्या लावण्यास सुरुवात करतात, मात्र यंदा ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाने मुक्काम केल्याने तयार विटा खराब झाल्या. श्रीवर्धन तालुक्यात दोन-तीन वर्षांपूर्वी एकूण 60 वीटभट्टीत उत्पादन सुरू होते. दिवसेंदिवस मजुरांची कमतरता व भट्टी लावण्यासाठी वापरात येणार्या भुशाच्या तुटवड्यामुळे जवळपास 42 वीटभट्ट्या बंद झाल्या आहेत. उर्वरित 18 वीटभट्ट्या सुरू असल्या तरी बदलत्या हवामानामुळे त्या अडचणीत आल्या आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिक विटांऐवजी आता सिमेंटचे ब्लॉक व चिरा दगड वापरत असल्याने विटांची मागणीही तुलनेने कमी झाली आहे. कच्चा माल, मजुरी वगळून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने वीटभट्टी व्यावसायिक अन्य व्यवसायाकडे वळत आहेत.
कोंड्याचा (भुसा) तुटवडा
श्रीवर्धन तालुक्यात 2016-17 मध्ये भातपिकाचे उत्पादन चांगल्या प्रमाणात होत असल्याने येथील आठ भात गिरण्यांमधून कोंडा मुबलक प्रमाणात मिळायचा. दिवसागणिक भातशेतीचे प्रमाण कमी झाल्याने गिरण्या बंद झाल्या आहेत. सध्या तालुक्यात आठपैकी दोनच भात गिरण्या सुरू आहेत. वीटभट्टी हा सहा महिन्यांचा व्यवसाय असून, या हंगामासाठी एका वीटभट्टी व्यावसायिकाला तीस ते पस्तीस टन कोंडा गरजेचा असतो, परंतु आता कोंडा उपलब्ध होत नसल्याने आणि इतर तालुक्यातील कोंडा आणणे खिशाला परवडत नसल्याने वीटभट्टी व्यावसायिक संकटात आले आहेत.
मजुरांची कमतरता
एका वीटभट्टीवर 12 जोड्यांची (24 मजूर) गरज असते. श्रीवर्धन तालुक्यात मजुरांची कमतरता असल्याने तालुक्याबाहेरचे मजूर आणावे लागतात. एका जोडीची दिवसाची मजुरी पंधराशे रुपये असून, सहा महिन्यांचा करार केला जातो. यासाठी बयाणा (आगाऊ रक्कम) द्यावा लागतो. सरकारकडून अपेक्षा नैसर्गिक आपत्तीत शेतकरी, बागायतदारांचे पिकांचे नुकसान झाल्यास सरकारकडून आर्थिक मदत मिळते. वीटभट्टी व्यवसाय साधारण जूनपर्यंत सुरू असतो, मात्र यंदा अवकाळी पाऊस त्यानंतर लांबलेल्या परतीच्या पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कच्चा माल खराब झाल्याने अनेक ठिकाणी अद्याप वीटभट्ट्या लावण्यात आलेल्या नाहीत. सरकारकडून वीटभट्टी व्यावसायिकांना माती उत्खननासाठी शंभर ब्रासचा परवाना मिळतो. त्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे.