गर्दी टाळण्याकरिता पोलिसांकडून शिट्टीचा वापर
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या चिन्हाचा प्रचार न करण्याचा शिरस्ता आहे. बुधवारी मात्र पोलिसांकडूनच अनवधानाने या शिरस्त्याचे उल्लंघन केले जात असल्याचे पाहायला मिळाले.
पनवेल विधानसभा क्षेत्रात भाजपातर्फे चौथ्यादा निवडणूक रिंगणात उतरलेले प्रशांत ठाकूर, शेकापतर्फे निवडणूक लढवत असलेले माजी शिक्षक आमदार बाळाराम पाटील आणि शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवार माजी नगरसेविका लीना गरड यांच्यात प्रमुख लढत आहे.शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे. प्रचारादरम्यान बाळाराम पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी शिट्टीच्या जोरदार आवाजात शिट्टीचा प्रचार केला आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर उमेदवारांच्या समर्थकांकडून शांततेत प्रचार करण्यात येत होता. मतदारांचा मतदान क्रमांक असलेल्या चिठ्यांच्या माध्यमातून उमेदवारांच्या चिन्हाचा प्रचार केला गेला. मतदानाच्या दिवशीही मतदान केंद्रा बाहेर बूथ लावून मतदारांना मार्गदर्शन करण्याचे काम कार्यकर्ते करत होते. त्याच वेळी मतदान करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मतदान केंद्राबाहेर वाहनांची गर्दी होऊ नये याकरिता केंद्राबाहेरील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, तरीसुद्धा अनेक वाहन चालक वाहतुकीसाठी बंद असलेल्या रस्त्यावर वाहन दामटण्याचा प्रयत्न करत असल्याने अशा वाहन चालकांना रोखण्यासाठी तसेच गर्दी हटवण्यासाठी पोलीस शिट्टीचा वापर करत असल्याने मतदान केंद्राबाहेर शिट्टी जोरात वाजत होती.