मतदान केंद्रात चक्कर येऊन खाली पडल्याने दुखापत
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग कोळीवाडा येथील केंद्रामध्ये मतदानाची लगबग सुरू होती. दरम्यान, कर्तव्यावर असणार्या एका महिला पोलीस कर्मचार्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कर्तव्य बजावत असताना चक्कर आल्याने खाली पडून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
बुधवारी मतदानासाठी कोळीवाड्यातील एका केंद्रामध्ये सदर महिला पोलिसाची नेमणूक करण्यात आली होती. दुपारी अचानक त्यांची प्रकृती बिघडू लागली. त्यांना चक्कर आली. त्यामुळे उपचारासाठी त्यांना अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह अलिबागचे उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी आणि पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी रुग्णालयात धाव घेतली. म्हात्रे या कर्तव्यावर रुजू झाल्या; परंतु त्यांनी त्याच्या आजारपणावर असलेली गोळी घेतली नाही. त्यामुळे चक्कर येऊन त्या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, उपचार करून सात टाके मारण्यात आले आहे. सध्या म्हात्रे यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.