। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईच्या मलबार हिल येथे एका पतीने आपल्या पत्नीची टॉवेलने गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
योगिता सुमीत वेदवंशी (25) या आपल्या पतीसोबत मलबार हिल येथे राहत होत्या. बुधवारी (दि. 20) योगिताचा पती सुमीत लक्ष्मण वेदवंशी (30) याच्यासोबत वाद झाला होता. या वादातून सुमीतने तिला मारहाण केली. त्यानंतर घरातील टॉवेलने योगिताचा गळा आवळला. यात योगिता खाली कोसळली असता तिला जवळच्याच एलिझाबेथ रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली असता तिचा मृत्यू झाला होता.
याबाबतची माहिती मिळताच मलबार हिल पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी तपासाला सुरूवात केली. योगिताची आई लक्ष्मी सुरेश नाडल (45) यांनी सुमितवर आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. लक्ष्मी यांनी सांगितले की, सुमितने योगिताचे दागिने यापूर्वी अभिषेक नावाच्या मित्राला दिले होते आणि त्यांच्यात सतत भांडणे होत होती. तसेच चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद व्हायचे. खुनाच्या दिवशीही असाच वाद झाला आणि सुमीतने रागाच्या भरात योगिताला मारहाण केली व त्यानंतर टॉवेलने तिचा गळा आवळून हत्या केली. लक्ष्मी नाडल यांनी दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी सुमितवर हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. तसेच, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.