नेरळ गावातील खांडा येथील दुदैवी घटना
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावातील खांडा भागातील टीवाले हॉटेलच्या बाजूला असलेल्या सरबताच्या गाडीला हात लागला आणि त्यात सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. आपल्या आईवडिलांसह आईस्क्रीम खात असताना बाजूला असलेल्या सरबताच्या गाडीला टेकल्यावर विजेचा प्रवाह सुरु असल्याने त्या धक्क्यात सहा वर्षीय रायमिन रफिक खान ही मुलगी मृत झाली.
कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर खांडा गावाच्या हद्दीत असलेल्या टीवाले हॉटेलच्या बाजूला रात्री आईस्क्रीम आणि सरबताची गाडी लागलेली असते. त्या गाडीवर आईस्क्रीम खाण्यासाठी नेरळ पूर्व भागातील साई मंदिर बोपेले येथे राहणारे रफिक खान हे आपल्या कुटुंबासह 20 नोव्हेंबरच्या रात्री साडेनऊ वाजता गेले होते. त्यावेळी आईस्क्रीमची गाडीवरील आईस्क्रीमचा कोन हातात घेऊन रफिक खान यांचे कुटुंब आईस्क्रीम खात उभे होते. त्या आइसक्रीम गाडीच्या बाजूला सरबताची गाडी होती. रायमिन हि सहा वर्षाची मुलगी आईस्क्रीम खात असताना तिचा हात त्या सरबताचा गाडीला लागला. सरबताची गाडीवरील सर्व साहित्य रात्रीची वेळ असल्याने बंद होते. मात्र, त्या सरबताच्या गाडीमध्ये शीतपेय असल्याने आत असलेल्या फ्रिजचा वीज प्रवाह रात्रीदेखील सुरु होता. त्या वीज प्रवाहाचा धक्का सहा वर्षीय मुलीच्या हाताला बसला ती त्या गाडीला चिकटवून बसली. त्यानंतर रायमिन खान हिला स्थानिक रहिवासी आणि पालकांनी खेचून काढली.
त्यानंतर रफिक खान यांनी आपल्या मुलीला तात्काळ डॉ. शेवाळे यांच्या रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी रायमिन रफिक खानला मृत घोषित केले. दरम्यान, रायमिनचे पालक रफिक खान यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे जाऊन रायमिनया मृत्यूस सरबताची गाडी जबाबदार असल्याची तक्रार केली. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी धावले यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी केली आहे. दरम्यान, रायमिन रफिक खान हिच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावर गुन्ह्याबद्दल पुढील कार्यवाही केली जाणार आहे. गुरुवारी सकाळी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून रायमिन रफिक खान हिचा मृतदेह पालकांकडे सुपूर्द करण्यात आला.
आठवडभरातील दुसरी घटना
14 नोव्हेंबर रोजी सकाळी बालदिन साजरा करीत असलेल्या मनीष धर्मेंद्र पाटील या 16 वर्षीय बालकांना उघड्या वीज रोहित्राचा धक्का बसला होता. त्यानंतर विजेचा धक्का बसून रायमिन या मुलीचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. रायमिन ज्या सरबताचा गाडीला चिकटली, त्या गाडीला वीज प्रवाह कोणत्या मीटरमधून झाला होता. त्याचवेळी सरबताच्या गाडीला अधिकृत वीजपुरवठा केला जात होता का? बंद असलेल्या सरबताच्या गाडीमध्ये वीज प्रवाह कसा आला, याबद्दल पोलीस आणि महावितरणकडून पंचनामा व्हायला हवा, अशी मागणी पालक करीत आहेत.