। तळा । वार्ताहर ।
विधानसभा मतदार संघासाठी बुधवारी (दि.20) झालेल्या मतदानाची तालुक्याची सरासरी पाहता नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जवळ 4.17 टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येत आहे. यावेळी महीला 10 हजार 769 व पुरुष 11 हजार 561 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 59.36% मतदान झाले आहे.
निवडणुकीच्या आयोगाच्या आदेशानुसार व जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासनाने मतदान जनजागृती मोहीम, शाळा कॉलेजमधून रॅली, पथनाट्यांमधून जनजागृतीला यश आलेले पाहायला मिळत आहे. मतदान सर्वत्र शांततेत, सुरळीत आणि उत्साहात झाले. 2019 च्या तुलनेत जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदारांनी विविध ठिकाणी मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. प्रशासनामार्फत आजारी, वयोवृद्ध, दिव्यांग मतदारांसाठी गृहभेट मतदान योजना, मंडप, पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हील चेअर, आरोग्य सुविधा आदींची सोय केली होती. त्यामुळे टक्केवारीत वाढ झाली असे दिसून येत आहे. तसेच, जिल्हा प्रशासनाने मतदान जनजागृती उपक्रम केलेल्या आवाहनाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली.
यावेळी मतदार संघाचे सर्व निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि पत्रकार या सर्वांच्या सहकार्यामुळे मतदान शांततेत, सुरळीत कोणताही अनुचित प्रकार न घडता उत्साहात पार पडले. त्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्यावतीने तालुक्याच्या तहसीलदार स्वाती पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.