| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कथित सौरऊर्जा कंत्राट लाचप्रकरणी उद्योगपती गौतम अदानी आणि इतरांवर अमेरिकेतील कोर्टात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. यावरून गुरुवारी (दि.21) लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्या अटकेची मागणी केली आहे. ते दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, हा मुद्दा संसदेत मांडणार आहे. विरोधी पक्षनेता म्हणून हा मुद्दा मांडण्याची जबाबदारी माझी आहे. याप्रकरणी जेपीसीकडून चौकशी होण्याची गरज आहे. तसेच गौतम अदानींना अटक करण्याची आमची मागणी आहे. परंतु, पंतप्रधान मोदी यांचे अदानींना संरक्षण मिळत आहेत. आता हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे की, अदानीने भारतीय कायदा आणि अमेरिकन कायदा दोन्ही मोडले आहेत. त्यांच्यावर अमेरिकेत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मला आश्चर्य वाटते की, अदानी या देशात मुक्तपणे कसे काय फिरू शकतात. अदानीने उघडपणे दोन हजार कोटींचा घोटाळा केला आहे. कदाचित इतरही अनेक घोटाळे केले आहेत, पण ते राजरोसपणे फिरत आहे. पंतप्रधान अदानींना संरक्षण देत आहेत आणि पंतप्रधान अदानीसोबत भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत, असाही आरोप गांधी यांनी यावेळी केला.