। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्याच्या मावळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रसिद्ध बैलगाडा मालकाचे अपहरण करून 50 लाखांच्या खंडणीसाठी हत्या करण्यात आली. हत्येनंतर मारेकऱ्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह जाळून टाकला. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने आरोपींना अटक केली आहे.
मयत पंडित जाधव हे 14 नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. आरोपींनी त्यांचे अपहरण केले आणि नंतर त्यांच्याच मोबाईलवरून त्यांच्या कुटुंबियांकडून 50 लाखांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पंडित जाधव यांच्या बंद मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले, तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. यातून मिळालेल्या माहितीतून पोलिसांसमोर सूरज वानखेडे या तरूणाचे नाव समोर आले. अखेर पोलिसांनी कसून तपास करत मुख्य आरोपी सूरज याला अटक केली. तर, हत्येच्या कटात सहभागी असलेला आरोपी रणजीत कुमार हा फरार आहे.
चौकशीदरम्यान सूरजने त्याचा गुन्हा कबूल केला. सूरजने त्याचा मित्र रणजीत याच्यासोबत प्रसिद्ध बैलगाडा मालक पंडित जाधव यांचे अपहरण केले. त्यांच्या कुटुंबियांकडून लाखोंची खंडणीही मागितली. त्यानंतर 14 नोव्हेंबरच्या रात्री तळेगाव एमआयडीसी परिसरात दोरीने गळा आवळून हत्या केली आणि
वहागाव येथील डोंगरावर मृतदेह जाळून विल्हेवाट लावली.