। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहर पोलिसांनी तक्का गावातील कातकरी वाडी परिसरात गावठी दारू विक्रीविरोधात कारवाई करत पार्वती पवार (45) या महिलेकडून 60 लिटर गावठी दारूसह एकूण 8 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला तक्का गावातील कातकरी वाडी परिसरात गावठी दारू विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार वपोनि बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार संदेश सदाशिव म्हात्रे, पोलीस हवालदार अविनाश गंथडे, पोलीस नाईक मिथुन भोसले, पोलीस नाईक सोमनाथ म्हात्रे, पोलीस शिपाई शशिकांत काकडे, महिला पोलीस शिपाई सुशीला सवार आणि महिला पोलीस शिपाई तेजस्विनी भगत यांनी पंचांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी एका झोपडीत पार्वती पवार हिच्याकडे चार प्लास्टिकचे कॅन आढळले. तपासणी केली असता प्रत्येक कॅनमध्ये 15 लिटर याप्रमाणे एकूण 60 लिटर गावठी दारू मिळून आली. पोलिसांनी गावठी दारूसह प्लास्टिकच्या पिशव्या, काळ्या रंगाची प्लास्टिकची बादली, स्टीलचा डबा, तीन स्टीलचे ग्लास, प्लास्टिकची गाळणी आणि बाटली असा एकूण 8 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दारूचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित मुद्देमाल पंचांसमक्ष सीलबंद करण्यात आला. या प्रकरणी पार्वती पवार हिच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.






