| खालापूर | प्रतिनिधी |
गावातील क्रिकेट मैदानावर क्रिकेट कोण खेळणार, या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यावेळी पाच जणांनी फिर्यादी आणि त्यांच्या चुलत भावाला शिवीगाळ व मारहाण केली. यातील एका आरोपीने फिर्यादीच्या डोक्यावर दगडाने वार करून जखमी केले.
शनिवारी (दि.14) मध्यरात्री 12.45 वाजण्याच्या सुमारास खालापूर तालुक्यातील माडप गावच्या हद्दीतील सर्कल परिसरात ही घटना घडली. आरोपी क्रमांक 1 ते 5 यांनी बेकायदेशीर जमाव जमवून गावातील क्रिकेट मैदानात क्रिकेट खेळण्यावरून फिर्यादीच्या चुलत भावाशी वाद घातला. त्याला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. याबाबत फिर्यादीने आरोपींकडे जाब विचारला असता त्यांनी फिर्यादीलाही शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली आणि हाताने मारहाण केली. यावेळी आरोपी क्रमांक एक याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने दगडाने फिर्यादीच्या डोक्यावर वार करून जखमी केले. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे करीत आहेत.






