परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त
| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
खांदा वसाहतीतील खांदेश्वर सरोवर परिसरात छठ पूजेच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणावर दगड आणि रेतीने भरलेल्या शेकडो गोण्या आणून टाकण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सरोवरात अशा प्रकारे भराव टाकण्यास सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.
खांदेश्वर सरोवर परिसर हा ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण तसेच सकाळी व्यायाम आणि चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. दररोज शेकडो नागरिक या परिसरात फेरफटका मारण्यासाठी येतात. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने सरोवरात अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. अशा परिस्थितीत छठ पूजेच्या निमित्ताने सरोवरात दगड आणि रेतीच्या गोण्या टाकून भराव करण्याच्या हालचाली सुरू असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, खांदेश्वर सरोवर अद्याप पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरित झालेले नसून ते सिडको प्रशासनाच्या अखत्यारित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या ठिकाणी छठ पूजेचे आयोजन करण्यासाठी नेमकी कोणत्या प्रशासनाची परवानगी घेण्यात आली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. धार्मिक भावना जपत सरोवराचे पर्यावरण आणि सार्वजनिक वापराचे महत्त्व लक्षात घेऊन सिडको प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे आणि वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






