। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
मतदान करण्यासाठी आपल्या मूळगावी गेलेल्या एका बँकेच्या मॅनेजरचे बंद असलेले घर अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यांच्या घरातील एक लाख 15 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
साहिल मुंडे हे कोपरखैरणे सेक्टर 23 मधील श्री लक्ष्मी को. ऑप सोसायटीत राहत असून ते ठाण्यातील एका बँकेत मॅनेजर म्हणून कामाला आहेत. बुधवारी (दि. 20) विधानसभेचे मतदान असल्याने मुंडे हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेले. त्यानंतर ते तेथूनच आपल्या मूळगावी माणगाव येथे मतदान करण्यासाठी निघून गेले. त्यामुळे त्यांची पत्नीदेखील मंगळवारी सायंकाळी आपल्या माहेरी वाशी येथे निघून गेली. या कालावधीत मुंडे यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या घरातील कपाटात असलेले 35 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आणि कानातले असा एक लाख 15 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
मतदान केल्यानंतर बुधवारी रात्री दहा वाजता मुंडे पती-पत्नी आपल्या घरी आले असता त्यांच्या घराचा कडी-कोंयडा तुटल्याचे तसेच घरातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.







