। मुंबई । वृत्तसंस्था ।
पॅट कमिन्सच्या नेतृत्वात आक्रमक पवित्र्यासह खेळणार्या सनरायझर्स हैदराबादने लिलावात चांगल्या खेळाडूंची निवड करत उत्तम संघ उभारला. युवा विकेटकीपर फलंदाज इशान किशनला हैदराबादने संघात घेतलं. दुसरीकडे त्यांनी अनुभवी मोहम्मद शमीला ताफ्यात घेतलं. शमीला साहाय्य करण्यासाठी हर्षल पटेलला समाविष्ट केलं. अभिनव मनोहरला घेण्यासाठी हैदराबाद संघव्यवस्थापन आतूर होतं. चुरशीच्या मुकाबल्यात हैदराबादने बाजी मारली. राहुल चहर या हुशार फिरकीपटूला त्यांनी आपल्याकडे वळवलं.
सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल 2024 मध्ये आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. 2024 मध्ये कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आक्रमक पवित्राने खेळत उत्कृष्ट कामगिरी केली. ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन आणि अभिषेक शर्मा यांनी तर अक्षरशः गोलंदाजांची बेदम धुलाई केली. हैदराबाद संघानेही आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी याच 5 खेळाडूंना रिटेन केलं आहे. जागतिक क्रिकेटमधील तीन विस्फोटक फलंदाज आणि एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज असताना आता हैदराबादचा संघ मधली फळी अधिक मजबूत करण्यासाठी लिलावात बोली लावणार आहे.
खेळाडूंसाठी प्रचंड बोली लावण्यासाठी हैदराबादच्या सहमालक काव्या मारन प्रसिद्ध आहेत. रविवारीही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत हैदराबादला चांगला संघ उभारुन दिला. हैदराबादच्या टेबलवर डॅनियल व्हेटोरी आणि मुथय्या मुरलीधरन हे जागतिक दर्जाचे फिरकीपटू प्रशिक्षकाच्या रुपात उपस्थित होते. सनराइजर्स हैदराबाद संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये हेनरिक क्लासेनला आयपीएल 2025च्या रिटेन्शनमधील 23 कोटी ही सर्वात मोठी रक्कम दिली. तर पॅट कमिन्सला 18 कोटी, ट्रॅव्हिस हेडला 14 कोटी, अभिषेक शर्माला 14 कोटी आणि नितेश कुमार रेड्डीला 6 कोटी देत संघाने कायम ठेवलं. रिटेंन्शननंतर हैदराबाद संघाकडे 120 कोटींपैकी 45 कोटी इतकी रक्कम शिल्लक आहे. संघाकडे एक राईट टू मॅच कार्ड देखील उपलब्ध आहे. तुफान फटकेबाजी करणारं त्रिकूट, उत्कृष्ट नेतृत्व आणि मजबूत फलंदाजी फळी असतानाही हैदराबादला केकेआरविरूद्ध आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि कोलकत्ता संघाविरुद्ध त्यांना लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आगामी आयपीएल स्पर्धेचे जेतेपद जिंकण्याचे संघाचे लक्ष्य असेल. हैदराबादच्या ताब्यात अनेक उत्कृष्ट खेळाडू होते.