दिवसाढवळ्या राजरोसपणे भराव सुरू
| पेण | प्रतिनिधी |
गेली तीन वर्षे पेण नगरपालिकेवर प्रशासक असल्याने अधिकार्यांचा मनमानी कारभार सुरू आहे, असा आरोप पेणकरांकडून करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच पेण अंतोरे रस्त्यावरील एका दुकान मालकाने झाडे तोडून, रस्ता दुभाजक फोडून दुकानात जाण्यासाठी रस्ता केला. त्याचप्रमाणे उत्कर्षनगरात दिवसाढवळ्या भराव करण्यात येत आहेत. त्यामुळे पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक नाले बंद होत आहेत. याकडे पालिका अधिकार्यांचे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असून, यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा उत्कर्षनगर पाण्याखाली जाईल, अशी भीती येथील रहिवाशांना सतावत आहे.
याबाबत पेण नगरपालिकेचे बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांना विचारणा केल्यावर त्यांनी नगरपालिकेच्या मालमत्तेचा नुकसान करणार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले होते. परंतु, अद्यापतरी कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे पालिका अधिकारी अशा लोकांना पाठीशी तर घालत नाही ना, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात उत्कर्ष नगरमध्ये दोन ते तीन वेळा नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरते. असे असतानादेखील पेण शहराच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात भराव झाल्याने पारंपरिक पाणी वाहून जाणारे मार्ग बंद झाले आहेत. गेल्याच पावसाळ्यात चिंतामणी सोसायटीच्या शेजारील कास्प बिल्डींगच्या बाजूच्या मोर्या बांधकाम गृहनिर्माण बांधकाम करणार्यांनी बंद केल्या होत्या, त्यामुळे उत्कर्षनगरमध्ये तीन दिवस पाणी भरलेले होते. शेवटी त्या मोरीत टाकलेला भराव काढल्याने पाण्याचा निचरा झाला. आत्ता तर रिंग रोडसाठी भराव सुरु आहे. तो भराव योग्यप्रकारे होत नसल्याने भविष्यात पूर्ण उत्कर्ष नगर पाण्याखाली जाणार आहे. तसेच पेण शहराच्या पूर्वेकडे मोठ मोठाले गृहनिर्माण प्रकल्प सुरु आहेत. त्यानेदेखील पेण-खोपोली मार्गावरील पाण्याचा निचरा होणारे मार्ग बंद केल्याचे दिसत आहे. त्यामुळे उत्कर्ष नगरासह शिंगरुत वाड्यापर्यंत पावसाचे पाणी तंबून नागरिकांना राहणे कठीण होणार असे काहीसे चित्र दिसत आहे. परंतु, त्याबाबत पेण नगरपालिका बांधकाम विभागाला काहीही पडलेले नाही. कारण, अधिकारीवर्गावर प्रशासकाचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे अधिकारी वर्ग स्वहित जोपासून मनमानेल तसे कारभार करीत आहेत. परंतु, या मनमानी कारभाराचा फटका उत्कर्ष नगरवासियांना झाल्याशिवाय राहणार नाही एवढे नक्की. रिंगरोडसाठी केलेला भराव आणि पूर्व भागामध्ये बांधकाम व्यावसायिकांनी केलेला भराव पाहता येत्या पावसाळ्यात उत्कर्ष नगरमध्ये पाणीच पाणी पहायला मिळेल.