‘हॉर्नबिल फूड प्लान्ट नर्सरी’ची निर्मिती
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
‘हॉर्नबील’ अर्थात प्रचलित मराठी भाषेत ‘धनेश’ नावाने तर कोकणी भाषेत ‘ककणेर’ नावाने ओळखल्या जाणार्या पक्ष्यांच्या प्रजाती व अस्तित्व वाढविण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे ‘हॉर्नबिल फूड प्लान्ट नर्सरी’ उभारली जात आहे. देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. ककणेर या पक्ष्याचे अस्तित्व आणि प्रजाती हळूहळू दुर्मीळ होण्याची चिंता पर्यावरणप्रेमी, पक्षी अभ्यासकांकडून व्यक्त होत असतानाच आता रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व देवरूख येथील पक्षीमित्रांनी धनेशची प्रजाती व अस्तित्व कायम ठेवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार देवरूख येथील आठल्ये सप्रे महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी पर्यावरणप्रेमींसाठी कार्यशाळा संपन्न झाली.
ककणेर या पक्ष्याचे मुख्य खाद्य म्हणजे वड, पिंपळ, उंबर अर्थातच फायकल्स जातीतील वृक्षांचा समावेश आहेे. या झाडांची फळे खाऊन वंशवृद्धीसह आपले अस्तित्त्व राखत असतात. मात्र, विकासाच्या वाटेवर हे वृक्ष उभे असल्याने त्यांची आता कत्तल होऊ लागली आहे. परिणामी ककणेर प्रजातीमधील पक्ष्यांचे जीवनावश्यक खाद्यान्न संपू लागले आहे. त्यामुळे भविष्यात ककणेरची प्रजाती हळूहळू दुर्मीळ होत नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची चिंता पर्यावरण, निसर्गप्रेमी व पक्षीमित्रांकडून व्यक्त होत आहे.
फायकल्स जातीतील वृक्षांची लागवड आणि वाढ होण्यास किमान पन्नास वर्षांचा कालावधी लागतो असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. तर, हॉर्नबिल याचे आयुर्मान तीस ते पस्तीस वर्षांचे आहे. त्यामुळे एखादी हॉर्नबिलची प्रजाती व कुटुंब त्याच्या आयुर्मानाच्या कालावधीत त्यांना पोषक असलेल्या खाद्यान्न झाडांची फळे उपलब्ध न झाल्यास ती संपूर्ण पिढी नामशेष होऊ शकते. ही झाडे लावण्यास व पूर्ण वाढ होण्यास 50 वर्षांच्या कालावधीत योगायोगाने दुसर्या पिढीचे अस्तित्व राहिले तर प्रजातीची वंशवृद्धी होईल.
हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता देवरूख येथील पक्षी, पर्यावरणप्रेमी प्रतीक मोरे, चिपळूणमधील पक्षी अभ्यासक नयनीश गुढेकर, पाचाड (चिपळूण) येथील नार्वेकर सॅन्च्युरीचे नितीन नार्वेकर, त्याचबरोबर डीबीजे महाविद्यालयातील वनस्पती विषयक अभ्यासक प्रा. बाबर आदींसोबत पंधरा ते वीस निसर्गप्रेमी तरुणांनी आता पर्यावरणाचे संतुलन राखण्यासह हॉर्नबिल वाचवा मोहीम हाती घेतली आहे.
पक्षांची विष्ठा गोळा करून बीजारोपण
पाचाड (चिपळूण) नार्वेकर सॅन्च्युरीच्या माध्यमातून नितीन नार्वेकर यांनी आपल्या मुलासह खासगी जंगल क्षेत्रात फायकल्स जातीतील झाडे वाढविण्यास सुरुवात केली आहे. ही झाडे केवळ पक्ष्यांच्या विष्ठेतूनच वाढतात आणि जगतात. हे लक्षात घेऊन या निसर्गप्रेमीनी विष्ठा गोळा करून बीजारोपण सुरू केले आहे. हॉर्नबिलच्या ऐंशी ठिकाणच्या घरट्यांजवळ कॅमेरे बसवून त्याचा अभ्यास करण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे.