। खारघर । वार्ताहर ।
खारघरमधील ग्रामस्थांना मागील महिन्याची वीजबिले मिळाली असून या वीजबिलांमध्ये गत महिन्यांच्या तुलनेत अचानकपणे दुप्पट ते तिप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली असून महावितरणकडून रिडींग न घेताच बिल पाठविले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
खारघर प्रकल्पग्रस्त गावची लोकसंख्या पाच हजारांहून अधिक आहे. ग्रामस्थांची शेतजमीन सिडकोकडे हस्तांतरण झाल्यामुळे बहुतांश सुशिक्षित तरुण रिक्षा तसेच जे मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदनिर्वाह करीत आहेत; तर काही ग्रामस्थ खोली भाड्याने देऊन उपजीविका करीत आहेत. दरम्यान, वीजबिलापोटी येणारे देयक नियमितपणे भरणा करीत असताना मागील महिन्यात बहुतांश ग्रामस्थांना वीजबिलांमध्ये गत महिन्यांच्या तुलनेत अचानकपणे दुप्पट ते तिप्पट वाढ करून वीजबिल पाठविण्यात आले आहे. काही ग्रामस्थांना मासिक अडीच ते पाच हजार रुपये; तर काहींना 18 ते 25 हजार रुपये वाढीव बिले देण्यात आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. महावितरणकडून रिडींग न घेताच वीजबिल पाठविले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून महावितरणने वीज मीटरची तपासणी करून त्यातील दोष दूर कन योग्य ती वीजबिले देण्यात यावीत, अशी मागणी केली जात आहे.
तक्रारीकडे महावितरणाचे दुर्लक्ष
महावितरणकडून देण्यात येणारे वीज देयक वेळेवर न भरणा केल्यास वीजजोडणी तत्काळ बंद केली जाते; मात्र ग्राहकांनी वाढीव बिलासंदर्भात तक्रार केल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते. महावितरणच्या वरिष्ठांनी ग्रामस्थांना वाढीव वीजबिले का देण्यात आली? या विषयी कर्मचार्यांकडे विचारणा करावी, तसेच योग्य प्रकारे वीजबिले देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.