मानधना-जेमिमाहची आक्रमक खेळी; तितास साधूचा आक्रमक मारा
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
भारतीय महिला संघाने रविवारी (दि.15) वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध टी-20 सामन्यात 49 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय महिला संघाने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. नवी मुंबईत झालेल्या या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर 196 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 7 बाद 146 धावाच करता आल्या.
दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वेस्ट इंडिजकडून कर्णधार हेली मॅथ्यूज आणि कियाना जोसेफ यांनी डावाची सुरुवात केली. परंतु, मॅथ्यूज फार काही करू शकली नाही. तिला दुसर्याच षटकात 1 धावेवर तितास साधूने बाद केले. यानंतर आलेल्या कॅम्पबेल (13) हिचा अडथळा दीप्ती शर्माने दूर केला. त्यानंतर कियानाला आणि डिटेंड्रा डॉटिन यांच्या भागीदारीमुळे वेस्ट इंडिजने 10 षटकांच्या आतच 80 धावा पार केल्या होत्या. परंतु, त्यांची भागीदारी तितास साधूनेच तोडली. कियानाने 33 चेंडूत 49 धावांची खेळी केली. चिनेल हेन्रीही 7 धावांवर बाद झाली.
यानंतर डॉटिन (52) हिने अर्धशतक झळकावले. परंतु, अर्धशतकानंतर तिला तितास साधूनेच बाद केले. तिच्या पाठोपाठ ऍफी फ्लेचरही शुन्यावर बाद झाली, तर झायदा जेम्सलाही 5 धावाच करता आल्या. यानंतर शबिका गजनबीने नाबाद 15 धावा केल्या, तर मंदी मंग्रूने नाबाद 2 धावा केल्या. अखेरीस 20 षटकांनंतर वेस्ट इंडिज 7 बाद 146 धावाच करू शकले. भारताकडून तितास साधूने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर दिप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
तत्पुर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजी केली. भारताकडून स्मृती मानधना आणि उमा छेत्री यांनी चांगली सुरुवात केली. त्यांनी सलामीला अर्धशतकी भागीदारी केली. त्यांची भागीदारी करिश्मा रामहाराकने मोडली. तिने उमा छेत्रीला 24 धावांवर बाद केले. त्यानंतर मानधना आणि जेमिमाह रोड्रिग्स या दोघींनी आक्रमक खेळत 81 धावांची भागीदारी केली. मात्र, स्मृती मानधना (54) अर्धशतकानंतर बाद झाली. तिलाही रामहाराकनेच बाद केले. ती बाद झाल्यानंतरही ऋचा घोषही (14) बाद झाली. यादरम्यान, जेमिमाह (73) हिनेही तिचे अर्धशतक पूर्ण केले, पण ती अखेरच्या षटकात बाद झाली. अखेरीस कर्णधार हरमनप्रीत कौर (13) आणि सजीवन सजना (1) नाबाद राहिल्या. भारताने 20 षटकात 4 बाद 195 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून करिश्मा रामहाराकने 2 बळी घेतले, तर डिटेंड्रा डॉटिनने 1 बळी घेतला.