शेतकरी न्यायासाठी उतरले रस्त्यावर
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील वावंजे येथील स.नं.123/2 या कॉरिडोअर महामार्ग वसई-विरार-पनवेल-अलिबाग संपादित जमिनीच्या खरेदीखत दस्त व्यवहारात शेतकर्यांची फसवणूक झाली आहे. याबाबत आपल्याला न्याय मिळावा, या मागणीसाठी शेतकर्यांनी सोमवारी (दि. 16) पनवेल येथील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालयासमोरील प्रांगणात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. दरम्यान, शेतकरी नामदेव शंकर गोंधळी यांनी न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
यावेळी नामदेव गोंधळी यांनी सांगितले की, सदर जमीन फसवणूक सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल (आकारफोड पत्रकात) भू.अ.का. पनवेलच्या अधिकारी वर्गाने तसेच तत्कालीन तहसील कार्यालयातील पदाधिकारी व मंडळ अधिकार्यांनी पाठविलेल्या खोट्या तलाठी अहवालाच्या अनुषंगाने तसेच जमीन विकत घेणार्याने बाहेरुन आणलेल्या चुकीच्या लेखी पुरसिसच्या अनुषंगाने केलेली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, माझा तसेच माझे काका व त्यांच्या मुलांची फसवणूक झाली असल्याचे गोंधळी यांचे म्हणणे आहे. तरी याबाबत शासनाने लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत अनिल ढवळे व अॅड. शेळके यांनीसुद्धा यासंदर्भात आम्ही फसवणूक झालेले शेतकरी नामदेव गेांधळी यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले आहे.