| पनवेल | प्रतिनिधी |
कळंबोली पोलिसांनी एका घरावर छापा मारून जवळपास सव्वा लाखांचा गुटखा साठा जप्त केला आहे. कळंबोलीतील दत्त अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन मधील घरावर छापा मारुन सदर घरामध्ये साठवून ठेवलेला 1 लाख 12 हजार 500 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू आणि गुटखा पोलिसांनी हस्तगत केला आहे. यावेळी सदर गुटख्याचा साठा करुन ठेवणारा आरोपी पळून गेला असून, कळंबोली पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
कळंबोलीतील दत्त अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन मधील बिल्डींग नंबर-16 मधील रुम नंबर 4 मध्ये गुटख्याचा साठा लपून ठेवण्यात आल्याची माहिती कळंबोली पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने छापा टाकला. मात्र, छापा टाकण्यापूर्वीच गुटख्याचा साठा करुन ठेवणारा आरोपी गोलू राजपूत याने पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी सदर घराची झडती घेऊन 1 लाख 8 हजार रुपये किंमतीच्या राज कोल्हापुरी गुटख्याच्या 10 गोण्या, तसेच 4500 रुपये किंमतीची तुलसी सुगंधी तंबाखुची 20 पाकिटे असा एकूण 1.12 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गोलू राजपूत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.







