| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल जवळील करंजाडे येथे सुरु असलेल्या रेल्वे पुलाच्या नवीन बांधणी संदर्भातील टाटा कंपनीचे 67 टन स्टीलच्या पार्ट चोरी प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जवळपास दीड कोटी रुपयाचा चोरीचा माल हस्तगत केला आहे. या ठिकाणी टाटा कंपनीचे रेल्वे पुल उभारण्याचे काम सुरु असून, तेथील मॅनेजर बिजयकुमार वर्मा (48) याने भंगारवाला आजीजूल अब्दुल रब रेहमान (47) यांच्याशी परवेज मोहम्मद अली आलव (29) यांच्या मध्यस्थीने संपर्क साधून तेथील साईटवरील स्टीलचे पार्ट चोरण्यास मदत केली व जवळपास दीड कोटी रुपयांचा माल चोरून नेला होता. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती शिंदे, पोहवा परेश म्हात्रे, संदेश म्हात्रे , अमोल पाटील, विनोद देशमुख आधीचे पथक तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या मदतीने शोध घेत असताना सदर माल चोरण्यासाठी जो हायड्रा वापरण्यात आला होता. याची माहिती पोहवा परेश म्हात्रे यांना मिळाली त्यानुसार त्याला ताब्यात घेतले असता पुढील माहिती मिळून सदर माल हा धानसर येथे ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन जवळपास दीड कोटी रुपयांचा चोरीचा माल हस्तगत करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.






