ज्येष्ठ पत्रकार सचिन देसाई बारावीची परीक्षा उत्तीर्ण
| माणगाव | प्रतिनिधी |
‘शिक्षणाला वयाची अट नसते’ या उक्तीचा प्रत्यय देणारी एक प्रेरणादायी घटना माणगाव तालुक्यात घडली आहे. माणगाव, जिल्हा रायगड येथील ज्येष्ठ पत्रकार सचिन शरद देसाई यांनी वयाच्या साठाव्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या जिद्दीचा आणि चिकाटीचा अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
सचिन देसाई यांनी 1984 साली दहावीची परीक्षा पूर्ण केली होती. मात्र त्या काळातील घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने पुढील शिक्षण घेणे शक्य झाले नाही. जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी त्यांनी शिक्षण अर्ध्यावर सोडून आय.टी.आय.चे शिक्षण घेत रोजगाराचा मार्ग स्वीकारला. आयुष्याच्या धकाधकीत अनेक वर्षे गेली, परंतु, शिक्षण पूर्ण करण्याची त्यांची इच्छा मात्र कायम मनात जिवंत राहिली. हीच अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांनी वयाची अट न मानता पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. कुटुंबीयांचा आधार आणि स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी 2026 साली बारावीची परीक्षा दिली आणि 41 टक्के गुण मिळवत ती यशस्वीरित्या उत्तीर्ण केली.
त्यांचा हा प्रवास केवळ वैयक्तिक यश नसून समाजासाठी एक प्रेरणादायी संदेश आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.







