एसटी बस आगारातील अधिकार्यांचा मनमानी कारभार
। अलिबाग । प्रमोद जाधव |
अलिबाग एसटी बस स्थानकातून पनवेलपर्यंत विनाथांबा शिवशाही एसटी बस सोडल्या जात होत्या. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून एसटी बस स्थानकातील अधिकार्यांच्या मनमानी कारभाराचा फटका या मार्गावरील प्रवाशांना बसत आहे. विना थांब्यासाठी साध्या एसटी बसचा वापर केला जात आहे. त्यामुळे प्रवासी वर्गात अधिकार्यांच्या कारभाराबाबत नाराजीचे सूर उमटत आहे.
अलिबागकडून मुंबई,ठाणे, बोरीवलीकडे जाणार्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. पनवेलहून एसटीतून गेल्यावर अन्य वाहनांनी मुंबई, ठाणेकडे जाणार्या प्रवाशांना त्यांच्या निश्चितस्थळी पोहचता येते. अलिबाग-पनवेल विनाथांबा प्रवासासाठी अलिबाग एसटी बस आगारात 18 शिवशाही बसेस दाखल झाल्या. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊवाजेपर्यंत ही सेवा दिली जाते. त्यामुळे पनवेलचा दोन तासाचा प्रवास दीड ते पावणे दोन तासाचा होऊ लागला. शिवशाही एसटी बस वातानुकूलित असल्याने प्रवाशांचा प्रवास आरामदायी होऊ लागला.साध्या बस ऐवजी शिवशाहीतून थेट पनवेलला जाण्यावर प्रवाशांनी भर दिला आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून एसटी बस स्थानकातील अधिकार्यांच्या मनमानी कारभार समोर आला आहे. शिवशाहीला पसंती असतानादेखील स्थानकातील काही अधिकारी प्रवाशांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत विनाथांब्यासाठी साध्या एसटी बसचा वापर करीत आहेत. अधिकार्यांच्या मनमानी कारभाराबाबत प्रवासी वर्गात तीव्र संताप आहे. एसटीचे उत्पन्न वाढविणे दूर प्रवासी संख्या कमी होण्याची भिती व्यक्त होत आहे.
मनमानीकरणार्या अधिकार्यांवर कारवाई होणार का?
अलिबाग-पनवेल विनाथांबा शिवशाही एसटीतून प्रवास करण्याला प्रवासी पसंती दर्शवित आहेत. शिवशाही एसटी असेल, तरच प्रवास करण्यावर भर देत आहे. मात्र स्थानकातील काही अधिकारी त्यांच्या मनमानी कारभारामुळे आगारातील उत्पन्न घटविण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे विभाग नियंत्रक दिपक घोडे या अधिकार्यांविरोधात कारवाई करतील का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अलिबाग एसटी बस आगारात 18 हून अधिक शिवशाही एसटी बसेस आहेत. या बसचा विनाथांब्यासाठी वापर केला जातो. आरामदायी प्रवास या एसटीतून होत आहे. परंतु आगारातील अधिकारी त्यांच्या मर्जीने कारभार करीत प्रवाशांची गैरसोय करीत आहेत. अनेक वेळा त्यांना सांगण्यात आले आहे. तरीही ते दुर्लक्ष करीत आहेत. शिवशाही विनाथांब्यासाठी बस सुरु ठेवण्यात यावी अशी प्रवाशांचीदेखील मागणी आहे.
समिर रांजणक,
रायगड एसटी प्रेमी
अलिबाग एसटी बस आगारात 19 बसेस आहेत. दहा बसेस विना थांबा सेवेसाठी उपलब्ध आहेत. प्रवाशांची मागणी वाढत आहे. त्यामुळे प्रवासी संख्या जास्त झाल्यावर साध्या बसेस वापरल्या जातात. परंतु प्रवाशांसाठी शिवशाही बसेस वापरण्याच्या सुचना संबंधित विभागातील कर्मचार्यांना दिल्या जातील. याकडे भर दिला जाईल.
राकेश देवरे,
आगार व्यवस्थापक







