। ठाणे । प्रतिनिधी ।
खुल्या राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाणेकर बॅडमिंटनपटू चिमुरड्या अॅल्फी मेकडनाथ हिने सुवर्णपदक तर मिश्र दुहेरीत इशिता कोरगावकर हिने रौप्य पदकाची कमाई केली आहे. मुंबई येथील एनएससीआय येथे नुकत्याच पार पडलेल्या योनेक्स सनराइज् राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाणेकर बॅडमिंटनपटूंनी उत्तम खेळाचे सादरीकरण करीत विविध वयोगटांमध्ये पदकांची लयलूट केली आहे. या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण 21 विविध गटांमध्ये संपूर्ण राज्यभरातून सुमारे 900 प्रवेशिका नोंदवल्या गेल्या होत्या.
ठाणे बॅडमिंटन अकॅडमी येथे वयाच्या आठव्या वर्षापासूनच बॅडमिंटन खेळाचे धडे गिरवणार्या अॅल्फी मेकडनाथ या चिमुकल्या खेळाडूने या हंगामातील लागोपाठ दुसरे राज्य अजिंक्यपद पटकावण्याची किमया साध्य केली आहे. अकरा वर्षाखालील गटात पहिल्या सामन्यापासूनच प्रभुत्व सिद्ध करीत अॅल्फीने दुसरे नामांकन प्राप्त तर केलेच, परंतु सर्व प्रतिस्पर्धी खेळाडूंचा एक हाती पराभव करीत उपउपांत्य फेरीत धडक देखील मारली. उपउपांत्य फेरीत अॅल्फीने अजिंक्य देसाई या खेळाडूचा 15-11, 15-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव करीत उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित केली तर उपांत्य फेरीच्या दीर्घकाळ चाललेल्या सामन्यात आदिराज शेट्टी या खेळाडूचा अॅल्फीने 24-22 23-21 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरीच्या रोमहर्षक सामन्यात अॅल्फीने अर्हम भंडारी या अतिशय गुणी खेळाडूचा 21-11, 20- 22, 21-18 असा पराभव करीत आपल्या कारकीर्दीतील लागोपाठ दुसरे राज्यस्तरीय सुवर्णपदक पटकावले. मिश्र दुहेरीत इशिता कोरगावकर हिने रौप्य पदक पटकावले आहे तर पुरुष एकेरीत श्वेतांक कर्णिक याने कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.