गतविजेत्या डिंग लिरेनला पराभवाचा धक्का
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने शानदार खेळ करून विश्वअजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेन याला तिसर्या फेरीत पराभवाचा धक्का दिला आहे. तसेच, 1.50-1.50 अशी बरोबरी देखील साधली आहे. या स्पर्धेच्या सलामीला पहिल्या डावात काळ्या मोहर्यांसह खेळताना चुका केल्यामुळे पराभव सहन करावा लागलेल्या गुकेशने तिसर्या डावासाठी कमालीची तयारी केल्याचे दिसून आले. मुळात चालीसाठी वेळेवर त्याचे नियंत्रण होते. त्याचवेळी लिरेन एकेक चाल करण्यासाठी बराच वेळ घेत होता.
तेराव्या चालीपर्यंत गुकेश घड्याळानुसार एक तास पुढे होता. जेथे लिरेनने एक, सात, सहा मिनिटे घेतली तेथे गुकेशने केवळ चार मिनिटांत चाली केल्या होत्या. 120 मिनिटांच्या निर्धारित वेळेत 40 चाली करायच्या असताना गुकेशने निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. यावेळी भारताच्या अर्जुन एरिगिसीविरुद्ध विश्वविजेत्या व्लादिमीर क्रामनिकने केलेल्या चाली गुकेशने केल्या. त्या सामन्यात एरिगिसीने कशीबशी बरोबरी साधण्यास यश मिळवले होते; पण गुकेशने अधिक आक्रमक चाली करून लिरेनला चुका करण्यास भाग पाडले.
लिरेनचा उंट गुकेशने अगोदरच संकटात आणला होता. त्यानंतर दोन प्याद्यांच्या मोबदल्यात उंट टिपल्यानंतर डावाच्या मध्यावर गुकेशची स्थिती मजबूत होत गेली. आपण उलटवार करू शकतो, असा विचार लिरेन यावेळी करत होता; परंतु त्याच्या प्रत्येक चालीला गुकेशने चोख प्रत्युत्तर दिले. वेळेचे गणित न जमवू शकलेल्या लिरेनला अखेरच्या नऊ चाली करण्यासाठी केवळ दोन मिनिटांचा अवधीच शिल्लक होता. त्यावेळी गुकेशने डावावरची पकड अधिक घट्ट केली होती. कमालीचा अस्थिर झालेल्या लिरेनला अखेरच्या सहा चालींसाठी केवळ 10 सेकंदच उरली होती. 37 चालीनंतर त्याच्याकडे वेळच उरलेला नसल्यामुळे गुकेशच्या नावावर पहिला विजय झळकला.