भारताचा ऐतिहासिक विजय
। रसायनी । वार्ताहर ।
बहारीनमधील हॉलडी-रिफा येथील इसा स्पोर्ट सिटी येथे जागतिक पॅरा तायक्वांदो संघटनेतर्फे पहिली जागतिक पॅरा तायक्वांदो पुमसे अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 2028 मध्ये अमेरिका येथील लॉस एंजलस येथे होणार्या पॅरालिंपिक स्पर्धेत यातील खेळ प्रकार समाविष्ट आहेत. यावेळी भारताच्या पॅरा तायक्वांदो संघाने ऐतिहासिक कामगिरी करत देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे.
इंडिया तायक्वांदो या जागतिक तायक्वांदो संघटनेशी संलग्न भारतीय तायक्वांदो संघातर्फे रायगड व नवी मुंबईतील 26 खेळाडूंसह प्रशिक्षक, फिजिओ, पदाधिकारी सहाय्यक असे एकूण 46 सदस्य या स्पर्धेसाठी बहारीनमध्ये दाखल झाले होते. भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत 4 सुवर्ण, 5 रौप्य व 8 कांस्यपदकांसह एकूण 17 पदके पटकावली आहेत. विशेष बाब म्हणजे भारतीय संघाने पहिल्यांदाच सांघिक विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक तुषार तानाजी सिनलकर यांची या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली होती. त्यांनी संघाला मार्गदर्शन करत ऐतिहासिक विजय संपादन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष व महाराष्ट्र ऑलिंपिक असो.चे सचिव नामदेव शिरगावकर यांनी संघप्रमुख वीणा अरोरा, सर्व प्रशिक्षक, सहकारी, फिजिओ डॉ. संहिता पूर्णपात्रे आदी सदस्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.