| चिरनेर | प्रतिनिधी |
परतीच्या पावसाला सामोरे जात उरण तालुक्यातील भातकापणी, बांधणी व झोडणीची कामे आता पूर्णत्वास आली असून, येथील शेतकरी आता रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे.
उरण तालुका कृषी कार्यालयामार्फत अन्न आणि पोषण सुरक्षा सन 2024-25 भात पड क्षेत्रामध्ये कडधान्य उत्पादन वाढविणे (हरभरा) यासाठी उरण तालुक्यातील शेतकर्यांना हरभरा या कडधान्याच्या वाटपाचे काम सुरू आहे. यात गुरुवारी (दि. 28) चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील शेतकर्यांना प्रत्येकी पाच किलो हरभरा कडधान्याचे वाटप कृषी सहाय्यक अधिकारी सूरज घरत व कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
उरण तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतशिवारात रब्बीची पिके मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. भाजीपाला तसेच वाल, चवळी, मूग, हरभरा, पावटा, राई अशी मोठ्या प्रमाणावर कडधान्य पिके येथील शेतकरी घेतात. येथील शेतशिवारातील जमिनीत रब्बी हंगामातील कडधान्य पिकांना जितका हवा तितका ओलावा असल्याने या भागातील शेतशिवारातील कडधान्य पिके मोठ्या जोमाने बहरतात. भातपिकांपेक्षा जास्त नफा देणारी ही कडधान्य पिके असल्यामुळे येथील शेतकरी कडधान्य पिकांवर जास्त भर देत आहेत. मात्र, जंगली वानरांच्या आणि मोकाट गुरांच्या मुक्त संचारामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या कडधान्य पिकांची पेरणी केल्यापासून शेतकर्यांना दिवसा व रात्रीचा जागता पहारा द्यावा लागत आहे. त्यामुळे हे रब्बी पीक उरण तालुक्यातील शेतकर्यांसाठी मोठे आव्हान असून, जंगली वानरे व मोकाट गुरे यांना पळवून लावण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत आहे.
या जंगली वानरांचा आणि मोकाट, उनाड गुरांचा बंदोबस्त व्हावा, यासाठी वनविभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी उरण परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
भातपिकांपेक्षा रब्बी पिकांमध्ये शेतकर्यांना मोठा फायदा मिळतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथील रब्बी हंगामतील कडधान्य पिकांवर जंगली वानरांची आणि मोकाट, उनाड गुरांची वक्रदृष्टी पडल्याने शेतकर्यांना हे पीक मोठ्या मेहनतीने पिकवावे लागते. तर येथील बर्याचशा शेतकर्यांनी जंगली वानरांच्या आणि मोकाट गुरांच्या त्रासाला कंटाळून हे कडधान्य पीक घेण्याचे बंद केले आहे. त्यामुळे येथील शेतकर्यांना कडधान्यातून मिळणार्या हजारो रुपयांच्या उत्पादनाला मुकावे लागले आहे.
– कृष्णा अनंत म्हात्रे, शेतकरी







