। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग मधील जेएसएम महाविद्यालयाच्या एनएसएस कॅम्पमध्ये अलिबाग-मुरुड मेडिकल असो. मार्फत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. शनिवारी (दि. 30) रोजी घेण्यात आलेल्या शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
अलिबाग-मुरुड मेडिकल असो.च्या अध्यक्षा डॉ. सुनीता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, विद्यार्थ्यांनी आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैली आत्मसात केली पाहिजे. वेळोवेळी आपल्या आरोग्य तपासणी करून घ्याव्यात, असे आवाहन देखील त्यांनी केले. डॉ. साक्षी पाटील यांनी यावेळी सांगितले कि, विद्यार्थ्यांनी आपल्या आहारात जंक फूड टाळावे, सकस आहार घ्यावा जेणेकरून आपले आरोग्य उत्तम राहील. यानंतर विदयार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी अलिबाग-मुरुड मेडिकल असो.च्या डॉक्टरांनी विद्यार्थ्यांचे आरोग्यविषयक निदान केले. तसेच, योग्य ते मार्गदर्शन करून औषधोपचार केले.
यावेळी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा व अलिबाग-मुरुड मेडिकल असो.च्या सचिव डॉ. साक्षी पाटील, असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सुनीता पाटील, उपाध्यक्षा डॉ. रेखा म्हात्रे, डॉ. अर्चना पाटील, डॉ. सुहानी पाटील, डॉ. प्रियांका नाईक तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, डॉ. पंकज घरत, डॉ. कपिल कुलकर्णी, प्रा. चेतना पाटील व एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांनी आरोग्य तपासणी शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.







