रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
। अलिबाग । प्रतिनिधी ।
श्रीवर्धनमधील एका 72 वर्षीय वयोवृद्धाची हत्या करणार्या जोडप्याला गजाआड करण्यात आले. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करीत त्यांना ठाणे व चेंबूर येथून ताब्यात घेतले. वृद्धाच्या एकांतपणाचा फायदा घेत लुबाडण्याच्या उद्देशाने लगट करीत विवाह करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर साथीदाराच्या मदतीने संपविले. मात्र, अवघ्या काही तासातच त्यांना पकडण्यात यश आले.
रामदास खैरे असे या मयताचे नाव आहे. ते बँकेत नोकरीला होते. सेवानिवृत्तीनंतर श्रीवर्धनमधील कुंदन रेसिडेन्सीमध्ये एका खोलीत ते एकटेच राहात होते. त्यांचा मोबाईल बंद असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रिकामे यांच्यासह त्यांच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घराचा दरवाजा बाहेरून बंद होता. त्याला कुलूप लावलेले होते. अखेर पोलिसांनी आतमध्ये जाऊन पाहणी केली असता, रामदास खैरे मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा दिसून आल्या. त्यामुळे त्यांचा कोणीतरी खून केल्याचा संशय बळावला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला. सायबर गुन्हे शाखेची मदत घेण्यात आली. अखेर दोन संशयित व्यक्ती असल्याची माहिती पथकाला मिळाली. चेंबूर व ठाणे येथून दोघांना उचलण्यात आले.त्यामध्ये एका महिलेचादेखील समावेश आहे. त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. पोलिसी दणका मिळाल्यावर दोघेही बोलके झाले. वयोवृध्दाच्या एकटेपणाचा फायदा घेत त्यांना लुबाडण्याच्या उद्देशाने लगट करीत आरोपी महिलेने विवाह करण्याचे आमिष दाखविले. त्यांच्या घरात राहून तिने विश्वास संपादन करून घरातील दागिने व पैसे घेऊन पसार झाली. त्यानंतर त्या महिलेने साथीदाराच्या मदतीने वयोवृद्धास ठार मारण्याचा कट आखला. 29 नोव्हेंबर रोजी रात्री जेवणामध्ये कीटनाशक देऊन बेशुद्ध करून कोणत्यातरी हत्याराने वार करून जखमी केले. उशीने तोंड व नाक दाबून ठार केले. घरातील साफसफाई करून मोबाईल, दागिने व पैसे घेऊन दोघेही पसार झाले. या गुन्ह्यातील आरोपी हर्षल कचर अंकुश याच्यासह महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना श्रीवर्धन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे अधिक तपास करीत आहेत.