खारघरपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरूवात
। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
तळोजा फेस 2 ला खारघरशी जोडणार्या उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. सध्या पुलाच्या शेवटच्या टप्प्यातील काम सुरु असून, पुलापासून खारघरपर्यंत जाणार्या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तळोजा फेस 1 आणि तळोजा फेस टू या परिसरात सिडकोमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेतून 30 हजार घरे बांधली जात आहेत. खासगी विकसकाकडूनदेखील या परिसरात इमारती विकसित केल्या जात असल्याने परिसराचे झापाट्याने नागरिकरण होत आहे.
दोन्ही वसाहतीमधून महामार्ग गाठण्यासाठी दिवा-पनवेल रेल्वे मार्गांवरील रेल्वे फाटक पार करावे लागत असल्याने फाटकामुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी तळोजा फेस 1 येथे अंडर पास बांधण्यात आला आहे. तसेच तळोजा फेस येथून खारघर सेक्टर 26 ला जोडणार्या रस्त्याकरिता रेल्वे मार्ग आणि मुंब्रा-पनवेल महामार्गावर उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय सिडकोमार्फत घेण्यात आला आहे. मात्र, काही तांत्रिक कारणाने या उड्डाणपुलाचे काम रखडले होते. पुलासाठी भूसंपादन करताना सिडकोने जमिनीच्या मालकी हक्काबाबत कायदेशीर बाबींची पडताळणी केली नाही. जमीन मालकाने मालकी हक्काचा वाद उपस्थित केल्याने उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षे रखडले होते. सिडको आणि जमीन मालकांमध्ये झालेल्या वाटाघाटीनंतर उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. आता मात्र हे काम पूर्ण झाल्याने तळोजा फेस दोनच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे. रखडलेल्या पुलाचे काम पूर्ण व्हावे यासाठी माजी नगरसेवक हरेश केणी यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला होता. पुलाचे काम पूर्ण होत आल्याने केणी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
रस्त्याचे काम जे.एम.म्हात्रे इन्फ्राला
तळोजा फेज दोन ते खारघर येथील कोस्टल मार्गाला जोडणारा हा रस्ता तळोजा आणि ओवापेठसमोरील खाडीमार्गे खारघर असा बांधण्यात येणार आहे. खाडीमार्गे रस्ता बांधण्यासाठी पर्यावरण मंत्रालय आणि वन विभागाकडून विविध परवानग्या देण्यात आल्याने रस्त्याच्या कमालादेखील सुरुवात करण्यात आली असून, हे काम जे.एम. म्हात्रे इन्फ्रा प्रा. लि. कंपनी करीत आहे.
मेट्रोचा पर्याय
पेंधर ते वेळापूरपर्यंतच्या मार्गावर मेट्रो सुविधा सुरु करण्यात आली आहे. तळोजा फेस एक आणि दोन मध्ये राहण्यासाठी आलेल्या नागरिकांची यामुळे मोठी सोय झाली असून, खारघरला जोडणारा उड्डाणपूल आणि रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर वसाहतीमधील वाहन चालकांना झटपट सायन-पनवेल महामार्गावरून मुंबई, पुणे गाठता येणार आहे.
काहीसा उशीर
2018 साली हातात घेण्यात आलेल्या पुलाचे काम 2024 साली पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, काम पूर्ण होण्यासाठी 2025 साल उजाडण्याची शक्यता आहे.