कोटब्याची वाडी ग्रामस्थांचा मार्ग सुकर
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
सुधागडच्या ताडगाव ते कोटब्याची वाडी रस्त्याचे 250 मीटर लांब रस्त्याच्या डांबरीकरणास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. यामुळे कोटब्याची वाडी ग्रामस्थांचा मार्ग सुकर होणार आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या वाडीपर्यंत डांबरी रस्ता जाणार आहे.
कोटब्याची वाडी ही आदिवासी वाडी असून, ही वाडी ग्रामपंचायत ताडगाव हद्दीमध्ये येते. या वाडीत जाण्यासाठी फक्त पायवाट आहे. आदिवासी बांधवांना आजारी पडल्यावर, गरोदर महिला व शाळेतील मुले व ग्रामस्थांना दळणासाठी जवळपास एक किलोमीटरचे अंतर डोंगरामधील दगड रस्त्यातून चालत जावे लागत होते. परंतु जिल्हा परिषद माजी सदस्य रवींद्र देशमुख, शिवसेना युवक (बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे, आमदार रविंद्र पाटील यांच्या माध्यमातून येथील अडीचशे मीटर रस्त्यासाठी दहा लाखांचा निधी उपलब्ध झालेला आहे. आणि कामाची सुरुवात केली आहे. त्यामुळे कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला कोटब्याची वाडीच्या रस्त्याला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये आनंदाची भावना आहे.