। नंदुरबार । प्रतिनिधी ।
नंदुरबारमध्ये एक भयानक प्रकार समोर आला आहे. संपत्तीसाठी चक्क नातवानेच आपल्या आजोबांवर चाकूचे वार करून हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा अल्पवयीन असून याप्रकरणी शहाद पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
नंदूरबारजवळच्या शहादा शहरात हा दुर्दैवी प्रकार घडला. रविवारी (दि. 08) रात्री 9 च्या सुमारास दशरथ राजे (60) हे जेवणानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर पडले होते. त्याचवेळी अल्पवयीन नातू आणि त्याचा एक साथीदार हे दोघे बाईकवरून त्यांच्याजवळ आले आणि राजे यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात राजे गंभीर जखमी झाले. त्यानंतर अल्पवयीन मुलगा आणि त्याचा साथीदार दोघेही तेथून फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मुलाने आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ राजे यांना रुग्णालयात नेले. मात्र, राजे गंभीर जखमी झाल्याने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच, याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.