| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज खडाजंगी पाहायला मिळत आहे. अशातच, विरोधी इंडिया आघाडीने राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांना हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे.
धनखर यांच्या विरोधात इंडिया आघाडी एकत्र आली असून, समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसदेखील अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्या निदर्शनांपासून दूर राहिलेल्या टीएमसी आणि सपा खासदारांनीही अविश्वास ठरावावर स्वाक्षरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्ष मंगळवारी राज्यसभेत सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकतात. अविश्वास प्रस्ताव तयार असून, त्यावर 70 सदस्यांनी स्वाक्षरी केल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यसभेच्या सभापतींना पदावरून हटवण्यासाठी किमान 50 सदस्यांच्या स्वाक्षर्यांसह प्रस्ताव सचिवालयाकडे पाठवावा लागतो. ही सूचना किमान 14 दिवस अगोदर दिल्यानंतर, राज्यसभेत उपस्थित असलेल्या बहुमताच्या आधारे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो लोकसभेत पाठवावा लागतो. राज्यसभेचे सभापती देशाचे उपराष्ट्रपतीदेखील आहेत. अशा स्थितीत त्यांना पदावरुन हटवण्यासाठी हा प्रस्ताव लोकसभेतही मंजूर होणे गरजेचे आहे.