बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत ठाणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती
। ठाणे । प्रतिनिधी ।
किसान काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष ॠषिकेश तायडे यांनी शेकापमध्ये प्रवेश केला आहे. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या आदेशाने व माजी आ. बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला असून ॠषिकेश तायडे यांची ठाणे शहर अध्यक्षपदीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी, युवक आघाडीचे निखिल शशिधरण व विष्णू येलकर देखील उपस्थित होते. त्यांनी ऋषिकेश तायडे यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. ऋषिकेश तायडे हे एक अनुभवी नेते आणि समाजसेवक आहेत. ते पूर्वी काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. किसान काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. त्या काळात त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या कल्याणासाठी अतिशय परिश्रम घेतले. भारतीय शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून त्यांनी गोरगरिबांच्या प्रश्नांवर काम करण्याचा आणि स्थानिक तरुणांचा विकास मजबूत करण्याचा संकल्प केला आहे. यावेळी बोलताना बाळाराम पाटील यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तरुण आणि सशक्त नेतृत्वाची गरज असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी ऋषिकेश तायडे यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट होईल आणि त्याचा विस्तार होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी तायडे यांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानले आणि आपल्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या मूल्यांना प्रामाणिकपणे जपत ठाणे शहरातील लोकांची निःस्वार्थ सेवा करण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला.