। रोहा । वार्ताहर ।
रोहे शहरात ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था संचालित विकलांग विद्यार्थ्यांची शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी धाटाव येथील सॉल्वे कंपनीकडून स्कुल बस भेट देण्यात आली आहे. शरीर विकलांग असल्यामुळे सरळ चालता बोलता न येणार्या विकलांग विद्यार्थ्यांची फार मोठी गैरसोय दूर झाल्यामुळे त्यांच्या चेहर्यावर समाधानाची लहर पसरली आहे.
ज्ञानगंगा बहुविकलांग या शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यासाठी खूप मोठी गैरसोय होत होती. यासाठी धाटाव एमआयडीसीमधील सॉल्वे कंपनीला ज्ञानगंगा बहुविकलांग संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कूल बसची मागणी करण्यात आली होती. या मागणीला कंपनी व्यवस्थापक मोहित जलोटा, एच.आर. मॅनेजर विजयकुमार चौगुले यांनी पाठपुरावा करून कंपनीच्या सीएसआर फंडातून विकलांग विद्यार्थ्यांसाठी संस्थेला सोमवारी (दि.16) बस भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्षा दर्शना आठवले, उपाध्यक्ष आर्ते, मुख्याधिपीका रजनी चव्हाण, शिक्षिका श्रिया जोशी, अर्चना भोईर, अभिजित लाड, बागडेव व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.