तरुणावर गुन्हा दाखल
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील पाषणे येथील तरुण आपल्या दुचाकीच्या डिकीमधून विदेशी मद्याची वाहतूक करीत असल्याचे तपासणी मोहिमेत नेरळ पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडील 37 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कर्जत-बदलापूर रोड येथे नेरळ पोलीस ठाण्यासमोर रविवारी (दि.15) वाहतूक पोलीस गाड्यांची तपासणी करीत होते. यादरम्यान, तपासणी करताना एका दुचाकीचालकाला थांबवले असता त्याच्या गाडीच्या डिकीतून विदेशी मद्याचा साठा सापडला. या गाडीतून विदेशी मद्याची विनापरवाना वाहतूक करीत असल्याचे उघडकीस आले. नेरळ पोलिसांनी या प्रकरणी त्या तरुणाला ताब्यात घेतले असून मद्यसाठा आणि त्याची स्कूटी देखील ताब्यात घेतली आहे. असा एकूण 37 हजार 350 रूपये किमतीचा मुद्देमाल नेरळ पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार प्रविण लोखंडे हे करीत आहेत.