चर्चेला परवानगी न दिल्याने विरोधक आक्रमक
। नागपूर । प्रतिनिधी ।
परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर या घटनेचा निषेध करणार्या आंबेडकरी अनुयायांवर पोलिसांकडून झालेला अमानुष लाठी हल्ला आणि बीड जिह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या या मुद्द्यावर विरोधक प्रचंड आक्रमक झाले होते. या विषयावर चर्चेला परवानगी न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या आ. नमिता मुंदडा यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर हल्ला चढवला आहे.
विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्यावतीने काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेद्वारे परभणीतील घटनेचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या घटनेवर राज्य सरकारला उत्तर द्यायचे आहे. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनाही चर्चेत सहभागी व्हायचे आहे. त्यामुळे उद्या या विषयावर चर्चा होईल, असे जाहीर केले.
काँग्रेसच्या नाना पटोले यांनी परभणीत पोलिसांच्या लाठीहल्ल्यात सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानंतर आंबेडकरी चळवळीत उमटलेल्या प्रतिक्रियेची माहिती दिली. परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करायला उशीर केला. त्यामुळे प्रकरण पेटत राहिले. परभणीतील पोलीस कोम्बिंग ऑपरेशन हे शासन निर्मित होते काय? परभणीची घटना पेटवत का ठेवली? असे सवाल करत पटोले यांनी यासंदर्भात नोटीस दिल्याचे अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यानंतर नितीन राऊत यांनी अध्यक्षांकडे चर्चा का घेतली नाही, अशी विचारणा केली. परभणीच्या घटनेचा निषेध म्हणून नांदेड, पुणे, मुंबईत बंद पुकारण्यात आला होता. दलित चळवळीतील कार्यकर्ते विजय वाकोडे यांना परभणीच्या घटनेत आरोपी करण्यात आले होते. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती देत या मागे कोण आहे, असा सवाल ही त्यांनी केला आहे. मात्र, त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी पुढील कामकाज पुकारल्याने विरोधी पक्षाने सरकारचा निषेध करत सभात्याग केली आहे.