। मुंबई । प्रतिनिधी ।
आजकाल आंबेडकरांचे नाव घेण्याची फॅशन झाली आहे. आंबेडकरांच्या ऐवजी देवाचे नाव घ्या तर स्वार्गात जागा मिळेल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केले होते. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपने माफी मागावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आ. आदित्य ठाकरे यांनी केली आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनीच आपल्याला आणि देशाला संविधान दिलेले आहे. ते आपल्या देशातल्या कोट्यवधी जनतेसाठी देवासारखेच आहेत. त्यांचा अपमान हा देश सहन करणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केले आहे त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला आहे. भाजपने यावर स्पष्टीकरण द्यावे आणि माफी मागावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहेत, देशातील कोट्यवधी जनतेसाठी ते देवच आहेत. आणि त्यांचा कोणी अपमान करत असेल तर हा देश सहन करणार नाही. भाजपच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्द जो द्वेष आहे, संविधानाबद्दल जो द्वेष आहे ते दिसून येत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.