वैद्यकिय अधीक्षकांचा मनमानी कारभार, कर्मचार्यांवर अतिरिक्त भार
। पेण । प्रतिनिधी ।
पेण शहर हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून पेण शहरामध्ये 50 बेडचे उपजिल्हा रूग्णालय आहे. परंतु उपजिल्हा रूग्णालय स्वतःच व्हेटींलेटरवर असल्याने रूग्णांच्या सेवेपेक्षा अनेक समस्यांच्या दृष्टचक्रात अडकल्याचे दिसून येत आहे. महत्त्वाची बाब, म्हणजे पेण उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षक म्हणून काम पाहणार्या संध्या रजपुत या आपल्या मुख्यालयात राहत नाहीत. त्याचप्रमाणे इतर वैद्यकीय अधिकार्यांबरोबर त्यांचे आपपासातील संबंध योग्य नसल्याने मोठया प्रमाणात इतर वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिक्षक यांच्यात मतभेद असल्याची जोरदार चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, वैद्यकीय अधिक्षक संध्या राजपूत या बाहय रूग्ण विभाग (ओपीडी) तपासणी करत नाहीत. त्या स्वत: भुलतज्ञ आहेत. मात्र पेण उपरूग्णालयात अशा फारशा शत्रक्रिया होत नाहीत. केवळ सिझरच्या वेळेला भुलतज्ज्ञाची गरज भासते. त्यासाठी देखील अनेकदा बाहेरून डॉक्टर बोलवले जात असल्याची माहिती कृषीवलच्या प्रतिनिधीकडे प्राप्त झाली आहे. त्यामुळे कळत-नकळत 24 तास काम करणार्या इतर वैद्यकीय अधिकार्यांवर भार पडतो. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी नाराज आहेत. तसेच राजपूत स्वतः मुख्यालयात राहत नसल्याने रात्रीच्या वेळी उपजिल्हा रूग्णालय रामभरोसे असते. हे सर्व कमी आहे की काय तर ज्या ठेकेदाराकडे उपजिल्हा रूग्णालयाची स्वच्छतेचा ठेका दिला आहे, त्या ठेकेदाराचे फक्त दोनच कर्मचारी असतात. त्यामुळे महिला व पुरूष दोन्ही विभागाच्या स्वच्छता गृहांमध्ये फक्त दुर्गंधी असते.
ठेकेदाराने रुग्णालयासाठी सात कर्मचारी देणे गरजेचे असताना तो दोनच कर्मचारी पुरवित आहे. परिणामी त्यांच्यावर कामाचा ताण पडतो. याबाबत त्या कर्मचार्यांनी वारंवार वैद्यकीय अधिक्षकांकडे अधिकच्या कर्मचार्यांची मागणी केली आहे. मात्र त्याकडेही राजपूत यांनी दुर्लक्ष केले असल्याची तक्रार स्वच्छता विभागात काम करणार्या कर्मचार्यांनी कृषीवलच्या प्रतिनिधींना दिली. ही बाब आमच्या प्रतिनिधींनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.देवमाने यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र त्यांनी नेहमीप्रमाणे आश्वासनांचे गाजर दाखविले. रूग्णालयात बसवण्यात आलेल्या अग्निशामक यंत्रणेची कोट्यवधींची बिले काढली आहेत. मात्र ही यंत्रणा कार्यन्वित आहेत का, त्यांची स्थिती काय आहे, याबाबत कोणतेही कागदपत्रे रुग्णालयाकडे उपलब्ध नाही. ही बाब देखील डॉ. देवमाने यांच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र अद्यापही त्यावर कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही.
वैद्यकीय तपासणी विभाग (रक्त, लघवी, थुंकी, शुगर, थायरॉईड), क्ष किरण विभाग (एक्स-रे), सोनोग्राफी विभाग यामध्ये काम करणारे कर्मचारी म्हणजे मनमानेल तसे राज्य करतात. कधी वेळेवर येत नाहीत, कधी वेळेवर रिपोर्ट देत नाहीत असे सर्व होत असताना देखील वैद्यकीय अधिक्षक संध्या रजपूत बघ्याची भुमिका घेत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांडून करण्यात आला आहे. पेण उपजिल्हा रूग्णालयात सात वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. परंतु कित्येक वेळा अपघातग्रस्त रूग्ण आल्यास त्यांना वेळेवर उपचार होत नाही. त्यांना तातडीने खासगी दवाखान्यात न्यावे लागते. तसेच सर्पदंश, कुत्रा चावल्याच्या रूग्णांवरही योग्यप्रकारे उपचार होत नसल्याने नागरिकांचा रोष कार्यरत असणार्या कर्मचार्यांना सहन करावा लागतो.
पांडुरंग गाडे यांच्याकडून सहकार्य
उपजिल्हा रुग्णालयातील मुख्य लिपिक पांडूरंग गाडे या व्यक्तीच्या गोडवाणीवर रूग्णालय चालत आहे. कोणतीही समस्या असली तरी ही व्यक्ती पुढाकार घेउन समोरच्या रूग्णांना मदत करत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले. मात्र एका व्यक्तीच्या खांद्यावर 50 बेडचे हॉस्पिटल चालू शकत नाही, हे सत्य आहे.
डॉ. देवमानेंनी बोलणे टाळले
जिल्हा रुग्णालयाच्या परिस्थितीबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवमाने यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, वैद्यकीय अधिक्षकांनी मुख्यालयात राहणे बंधनकारक आहे. त्या राहत नसतील तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. मात्र स्वच्छतेच्या बाबत व अग्निशामक यंत्रणेच्या बाबत विचारणा केली असता शल्यचिकित्सक डॉ. देवमाने यांनी बोलणे टाळून फोन बंद केला. त्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे.