। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गाच्या खवटी ते परशुराम घाट या 44 किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरणात तब्बल 100हून अधिक ठिकाणी काँक्रिटीकरण रस्त्याला तडे गेले आहेत. याबाबत भरणे येथील सामाजिक कार्यकर्ते रूपेश पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देत चौपदरीकरणातील चुकीच्या कामाच्या चौकशीची मागणी केली आहे. खवटीपासून परशुरामदरम्यानच्या चौपदरीकरणाचे काम कल्याण टोलवेज कंपनीने केले असून, अनेक ठिकाणी निकृष्ट काम झाल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे.
तसेच, यावर्षीच्या पावसाळ्यात महामार्गावरील भरणे-वेरळ रस्त्यालगतची संरक्षक भिंत एक ते दीड फूट सरकली आहे, असा आरोपही पवार यांनी केला आहे. दरम्यान, जगबुडी नदीवरील पुलावरून वाहतूक सुरू होताच काही महिन्यातच मध्यभागी खड्डा पडल्याने वाहनांना ब्रेक लावण्यात आला. या ठिकाणी गर्डर बसवून तात्पुरती मलमपट्टी करण्यापलीकडे काहीच केलेले नाही. त्याचबरोबर महामार्गावरील भोस्ते घाटातील मुख्य वळणदार रस्त्यावर एका बाजूला उंच डोंगर असून, दुसर्या बाजूस सिमेंट काँक्रिटची भिंत उभारली आहे. हे कामही निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत टीकेची झोड उठल्यानंतरसिमेंट काँक्रिटचा माल टाकून भेगा तात्पुरत्या बुजवण्याचा प्रयत्न केला. परशुराम घाट हद्दीत सर्व्हिस रोडची उभारणी जुन्या रस्त्यावर केली असून, हे कामही दर्जाहीन झाल्याचा आरोप रूपेश पवार यांनी केला आहे.