साडेतीन हजार नवीन घरपट्टीधारक तयार
। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरात साडेतीन हजार नवीन घरपट्टीधारक तयार झाले आहेत. त्यांच्या मिळकतींना पालिकेच्या कर निर्धारण विभागाच्या माध्यमातून घरपट्टी लागू करण्यात यश आले आहे. यामुळे घरपट्टीच्या महसुलात दरवर्षी 2 कोटी 50 लाखांची भर पडणार आहे.
जीएसटीतून मिळणार्या अनुदानाखालोखाल घरपट्टीतून मिळणारा महसूल महापालिकेच्या उत्पन्नाचे सर्वांत मोठे स्रोत आहे. मागील आर्थिक वर्षासाठी घरपट्टीकरिता सुमारे 16 कोटी वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. यापैकी जवळपास 95 टक्के घरपट्टी वसूल झाली होती. पालिकेमार्फत दर 4 वर्षांनंतर एकदा सर्वे केला जातो. नव्याने तयार होणार्या तसेच नोंदणी नसलेल्या, वापरातील बदल आणि वाढीव बांधकाम अशा मालमत्तांचा शोध घेऊन पालिकेकडून अशा मालमत्तांना कर लागू केला जातो. त्यासाठी मालमत्ताधारकांना विशेष नोटिसा देऊन प्रथम कर निर्धारणाची मागणी केली जाते.
चिपळूण शहरात काही वर्षांपूर्वी महापूर आला होता. या महापुरात पालिकेतील सर्व दस्तावेज वाहून गेले होते. शहरातील मिळकतदारांच्या नोंदीचे दस्तावेजही वाहून गेले होते. त्यामुळे पालिकेने एका खासगी एजन्सीमार्फत शहराचा सर्वे केला आहे. शहरातील सर्व मिळकतींची नोंद करून घेतली. त्यानुसार शहरात एकूण 31 हजार 743 घरपट्टीधारक आहेत. त्यात साडेतीन हजार नवीन घरपट्टीधारक तयार झाले आहेत. काही जुन्या घरपट्टीधारकांनी आपल्या मालमत्तेच्या मूळ रचनेत बदल केले आहेत. काहींनी वाढीव बांधकाम केले आहे. अशा घरपट्टीधारकांचा शोध घेऊन पालिकेने त्यांनाही नोटीस काढली आहे. ज्यांचे वाढीव बांधकाम झाले आहे त्यांच्या घरपट्टीमध्ये वाढ होणार आहे. तसेच, जे नवीन घरपट्टीधारक तयार झाले आहेत त्यांच्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. असे एकूण 18 हजार घरपट्टीधारकांना पालिकेने नोटीस बजावली आहे.
चिपळूण शहरातील ज्या मिळकतदारांनी वाढीव बांधकाम करून त्याचा कर पालिकेला भरला नाही अशा लोकांना आम्ही नोटिसा काढल्या आहेत. त्यांनी समजूतदारपणा दाखवून कर भरणा करावा. ज्या ठिकाणी सर्वेमध्ये चुका झाल्या असतील त्याही दाखवाव्यात. पालिका त्या दुरुस्त करेल. कोणी दबावतंत्राचा वापर केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही.
सतीश दंडवते,
उपमुख्याधिकारी, चिपळूण पालिक