नौदलाचे अक्षम्य दुर्लक्ष; पर्यटकांची संख्या रोडावली
। चिरनेर । प्रतिनिधी ।
घारापुरी बेटावरील ऐतिहासिक तोफा आणि परिसर दुर्लक्षित राहिला आहे. नौदलाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे राष्ट्रीय ठेव्याची पार दैन्यावस्था झाली आहे. यामुळे हा ऐतिहासिक ठेवा अडगळीत पडल्याने देशी-विदेशी पर्यटकांतुन नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच, या तोफा पाहण्यासाठी येणार्या पर्यटकांची संख्या देखील रोडावली असल्याचे येथील नागरीकांनी सांगितले आहे.
ऐतिहासिक घारापुरी लेण्यांना ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा प्राप्त झाला आहे. या लेण्यांपासुन अवघ्या 500 मीटर अंतरावर डोंगर माथ्यावर दोन ऐतिहासिक पोलादी तोफा आहेत. ब्रिटिशकाळात मुंबई बंदराच्या संरक्षणासाठी सुमारे 20 फुट लांबीच्या या दोन तोफा डोंगरमाथ्यावर बसविण्यात आल्या होत्या. या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या व देशी-विदेशी पर्यटकांसाठी आकर्षण असलेल्या तोफा पाहाण्यासाठी नेहमीच हजारो पर्यटकांची गर्दी असायची. परंतु, नौदलाच्या अखत्यारीत असलेल्या या तोफा आणि परिसराची अगदी दैना उडाली आहे. तसेच, या ऐतिहासिक तोफांकडे जाण्यासाठी लेण्यांकडून जाणारा एकमेव पायवाटेचा रस्ता असून या पायवाटेवरअसलेल्या पायर्यांची पार दुर्दशा झाली आहे. या तुटलेल्या पायर्यांवरून चालताना तोल जाऊन पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
तसेच, या पायवाटेवर मोठी दगडं आणि झाडे कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे पर्यटकांना तोफा पाहाण्यासाठी जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. पुढे असलेल्या 20 फुट लांबीच्या भुयारी पादचारी मार्गात देखील प्रचंड अस्वच्छता पसरली आहे. तोफांच्या तळावरील प्लॅटफॉर्मचे अवशेष गंजून गेले आहेत. तोफांच्या आजुबाजुला प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या पडल्याने अस्वच्छतेचे वातावरण पसरले आहे. डोंगरमाथ्यावरील ऐतिहासिक ठेवा अशा प्रकारे अडगळीत पडल्याने आणि अनेक अडथळ्यांमुळे पर्यटकही तोफा पाहाण्यासाठी फारसे फिरकत नसल्याची खंत स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
तोफा आणि परिसराची जागा नौदलाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे त्याकडे पुरातन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. पुरातन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून नौदलाच्या अधिकार्यांशी संपर्क साधुन माहिती दिली जाते. मात्र, नौदलाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
कैलास शिंदे,
घारापुरी लेणी केअर टेकर
जागा-जमिनीचे काम असल्यावरच नौदलाचे अधिकारी वर्ष दिडवर्षांनी बेटावर हजेरी लावतात. त्यावेळी बेटावरील दुर्लक्षित ऐतिहासिक तोफा व परिसराची माहिती दिली जाते. मात्र, नौदल अधिकारी त्याकडे कायम कानाडोळा करीत आहेत.
बळीराम ठाकूर,
उपसरपंच







