महिला पर्यटकांची प्रचंड गैरसोय
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहराचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे प्रवासी संकलन केंद्राच्या बाजूला महिला पर्यटकांना आपल्या बाळाला स्तनपान करता यावे यासाठी हिरकणी कक्ष निर्माण केले आहे. याच हिरकणी कक्षाला टाळे लागले असून महिला पर्यटकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, या हिरकणी कक्षाच्या बाजूने माथेरान पालिकेचे मुख्याधिकारी माथेरान शहरात येत-जात असतात आणि तरी देखील त्यांचे हिरकणी कक्षाकडे दुर्लक्ष होत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान, शहरातील नागरिक जनार्दन पारटे यांनी रायगड जिल्हाधिकार्यांना निवेदन देत आवाज उठविला आहे.
माथेरान या ठिकाणी दरवर्षी साधारण 14-15 लाख पर्यटक येत असतात. त्यात महिला पर्यटकांची संख्या देखील काही लाखात असते. यावेळी आपल्या लहान मुलांना घेऊन येणार्या महिला पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन तत्कालीन मुख्याधिकारी सुवर्णा भणगे यांनी हिरकणी कक्षाची निर्मिती केली होती. हिरकणी कक्षात महिलांना आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी एकांत मिळावी हा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, त्याच हिरकणी कक्षाला गेली वर्षभर टाळे लागले आहे. हा हिरकणी कक्ष बंद असल्याने महिला पर्यटकांची चांगलीच गैरसोय होत आहे.
यावेळी, टॅक्सीमधून उतरलेले प्रवासी पर्यटक हिरकणी कक्षाला टाळे लावलेले पाहून नाराजी व्यक्त करीत आहेत. याचबरोबर माथेरानमधील नागरिक देखील नाराजी व्यक्त करीत आहेत. तसेच, याला पालिका मुख्याधिकारी यांची हिरकणी कक्षाबद्दल उदासीन भूमिका जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.