| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी (दि.21) मध्यरात्री कोलाड नजिक लक्झरी धावत्या बस ने पेट घेतला, सुदैवाने बस मधून प्रवास करणारे प्रवासी बचावले असून कोणतीही जिवीत हानी झाली नाही, परंतु बस पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. तर कोलाड नजिक कोकण रेल्वे पुलाखाली ही भयावह घटना घडली मात्र घडलेल्या घटने दरम्यान सुदैवाने कोणतीही रेल्वे गाडी न धावल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती, तर या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रात्री बाराच्या सुमारास खासगी प्रवासी वाहतूक बसगाडी मुंबई बोरिवलीहून महाड मालवणच्या दिशेने जात असताना कोलाड नजिक कोकण रेल्वे पुलाजवळ अचानकपणे गाडीच्या पाठच्या बाजूने जोरदार आवाज आला बस चालकाने ताबडतोब बस थांबवली व गाडीतील किनर ने पाठी जाऊन तपासले असता गाडीमध्ये आग लागल्याचे निदर्शनात आले. गाडीमध्ये एकूण 30 प्रवासी तसेच दोन चालक व दोन कर्मचारी होते. तातडीने सर्वांना खाली उतरवण्यात आले. जवळच असलेले पोलीस प्रशासन तसेच चंद्रकांत लोखंडे, विनायक लोखंडे, दादा धुमाळ, वनविभागाचे अधिकारी, शिक्षक गर्जे, आशिष वाणी व असंख्य सतर्क नागरिक यांच्या मदतीने सतर्क नागरिकाने सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला संपर्क साधला माहिती मिळताच एसव्हीआरएसएस टीम धाटाव औद्योगिक अग्निशमन दल तसेच दीपक नायट्रेट फायर टीम घटनास्थळी दाखल झाली व लागलेल्या आगीवरती नियंत्रण आणण्यात आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु गाडीचे फार मोठे नुकसान झाले आहे. तसेच आगीवर नियंत्रण होताच काही काळानंतर पोलिसांकडून वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल होत तत्काळ मदत कार्य सुरू केली. या घटनेचा अधिक तपास कोलाड पोलीस करीत आहेत.